देवस्थान विटंबनाप्रकरणी आंदोलन

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

मागील काही दिवसांपासून लव्हेज गावातील वेताळ देवस्थान विटंबना प्रकरणाबाबत पालिका प्रशासन व पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर आता ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपाचा लढा देण्याचा एल्गार केला आहे.

लव्हेज गावाच्या परिसरातील स्टील कारखान्याच्या अतिरिक्त निवासी संकुलांच्या जागेतील निवासी संकुले कंपनी व्यवस्थापनाने पाडली असून, सपाटी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच, या जागेवर पूर्वीपासून ग्रामस्थांचे वेताळ देवस्थान आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी कारखाना व्यवस्थापन ठेकेदार व स्थानिक पोलीस यंत्रणांना या देवस्थानाबद्दल माहिती दिली होती. असे असतानाही सपाटीकरण करणाऱ्या ठेकेदाराने एका रात्रीच हे वेताळ देवस्थान जेसीबी यंत्राने अन्यत्र हलवल्याने ग्रामस्थांन याबाबत तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या जागेत आमचे देवस्थान आहे. त्याच जागी आमचा देव बसवावा. अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत ग्रामस्थांतर्फे मोर्चाही काढण्यात आला.

Exit mobile version