चिंचवली हद्दीतील गावांना पाण्याचे कनेक्शन द्या: आ. जयंत पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामीण पाणीपुरवठा व शिखर समिती/रेक्स झोन क्र. 2 प्रादेशिक योजनेच्या नवीन पाईपलाईनवरून असलेल्या ग्रामपंचायत रेवसच्या अनधिकृत जोडणी बंद करून चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील गावांना कनेक्शन दिले जावे, अशी मागणी शेकाप आ. जयंत पाटील यांनी विशेष उल्लेखाद्वारे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्र्यांकडे केली.

सन 2019 मध्ये ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीने पुढाकार घेऊन ग्रामपंचायत वैजाळी पर्वत गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दि. 1-6-2011 रोजी शिखर समिती स्थापन करून व तत्कालीन आ. मीनाक्षी पाटील आणि माजी जि.प. अध्यक्ष पंडित पाटील यांच्या प्रयत्नाने शासनाकडून पायलट योजना मंजूर करून घेतली असून, सदरील योजनेत चिंचवली ते वैजाळी या ग्रामपंचायतींचा समावेश होता. सदर योजनेसाठी मांडवखार, चिंचवली, रांजणखार व फोफेरी या गावांनी 10 टक्के लोकवर्गणी जमा करून भरलेली आहे.

सदर योजनेतून कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद यांनी चिंचवली ते मांडवखार यांना जोडणी करून पाणीपुरवठा करण्यात आलेला होता. परंतु, रेवस, शिरवली, नारंगी व माणकुले या ग्रामपंचायतींनी तक्रार करून सदर पाणीपुरवठा बंद करण्याचे सांगण्यावरून उपअभियंता, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी पोलीस बंदोबस्तात सदरील योजनेच्या पाईपलाईनवर जोडण्यात आलेले नळ पाईपलाईन सोडून त्यांचे पाणी बंद करण्यात आलेले आहे. सबब चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील गावांचा बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा, यासाठी मी या विशेष उल्लेखाद्वारे मागणी करीत आहे, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे केली.

Exit mobile version