| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
तळोजा फेज-2, सेक्टर 27 येथील आसावरी गृहसंकुलातील पाणीटंचाईचा प्रश्न गेल्या पाच वर्षांपासून कायम आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी कुटुंबीयांसह बेलापूर येथील सिडको भवनावर मोर्चा काढत सिडको प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी “पाणी द्या, नाहीतर सत्तेच्या खुर्च्या खाली करा”, अशा घोषणांनी सिडको भवन परिसर दणाणून गेला होता. यादरम्यान, सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत रहिवाशांची चर्चा झाली असून, पंधरा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
आसावरी गृहसंकुलातील रहिवाशांना 2021 मध्ये घरांचा ताबा मिळाला होता. त्यावेळी 24 तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात चार ते आठ दिवसांच्या अंतराने अवघे दहा मिनिटे पाणी मिळत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठी बाटल्या आणि जार विकत घेण्याची वेळ आली आहे. ऐन पावसाळ्यात देखील आसावरीतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गच्चीवरून पाइपद्वारे वाहून येणारे पावसाचे पाणी बादल्या आणि हंड्यांमध्ये साठवून शौचालय तसेच इतर घरगुती कामांसाठी वापरावे लागत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली. तसेच, “पाऊस कधी पडणार याची वाट पाहणाऱ्या शेतकरी राजासारखी आमची अवस्था झाली आहे,” अशी भावना सामाजिक कार्यकर्ते सतीश राठोड यांनी व्यक्त केली.
मोर्चानंतर रहिवाशांची सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा झाली. यावेळी पंधरा दिवसांत पाणीपुरवठ्याची समस्या मार्गी लावून नियमित पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, त्याबाबत लेखी पत्रही देण्यात आल्याचे रहिवाशांनी सांगितले. मात्र, “यापुढे केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष सुरळीत पाणीपुरवठा हवा,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे.






