| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यातील दरडप्रवण गावे, पूरप्रवण गावांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी एक हजार 32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत दिली. रायगड जिल्ह्यातील 355 गावांना पावसाळ्यात पूर व दरडी कोसळण्याचा धोका असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री पाटील बोलत होते.
रायगड जिल्ह्यात वरिष्ठ भू-वैज्ञानिक तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार डोंगरमाथ्यावर, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 103 गावांना दरडीपासून धोका लक्षात घेता यामधील 9 अती धोकेदायक, 11 मध्यम स्वरूप धोकेदायक आणि 83 कमी धोकादायक, अशी गावे आहेत. यामधील दरडप्रवण गावे, पूर प्रवण गावे, या ठिकाणी आपत्कालीन बाब उद्भवल्यास तात्पुरत्या स्थलांतरासाठी शाळा, समाजमंदिरे आदी ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
आपत्तीस तत्काळ प्रतिसाद देण्याकामी गावनिहाय तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी सेवक, कोतवाल, पोलीस पाटील, आपदा मित्र, सखी, स्थानिक स्वयंसेवी संस्थामधील सदस्य मिळून पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच कोणत्याही आपत्तीस तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये ु247 तास तालुका नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी एक हजार 32 कोटी रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.