| उरण | वार्ताहर |
गव्हाण फाटा वाहतूक शाखेतर्फे फुलक्रम कंटेनर यार्ड येथे नागरिकांमध्ये वाहतुक नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी वाहन चालकांना हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, सिग्नल पाळणे याबाबत प्रबोधन करण्यात आले.
सदरचा उपक्रम नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे व सहाय्यक पोलीस आयुक्त भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. जनतेने पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने किंवा दंडाच्या भीतीने नियम न मोडता स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, असे यावेळी गव्हाण फाटा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी सांगितले. यावेळी हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, सिग्नल पाळणे, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह न करणे, वाहन चालवतेवेळी मोबाईल फोनचा वापर न करणे इत्यादी वाहतूक नियमांबाबत जाणीव जागृती करण्यात आली. सदर वेळी फुलक्रमयार्डचे मॅनेजर रमाकांत साळवे, दिगंबर काठे तसेच यार्ड मधील कंटेनर चालक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, वाहतूक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







