क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती

| अलिबाग | प्रतिनिधी |

जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनारा येथे आयोजित मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमादरम्यान क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान देणाऱ्या ‘निक्षय मित्र’ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यात विविध ठिकाणी क्षयरोग दिन साजरा करण्यात आला व त्यानिमित्ताने क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरित करण्यात आले. यावेळी जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथून रॅली काढून, पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली. तसेच सर्वांना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतीची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमास उपाध्यक्ष मधुकर पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री संजना काळे, भास्करराव पेरे पाटील, वैकुंठ पाटील, अमित नाईक, जनार्दन भस्मा, प्रभाकर म्हात्रे, संतोष बैलमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version