। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या सूचनेनुसार, कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.22) कामोठ्यात महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत एमजीएम कॉलेजमधील शिक्षक व विद्यार्थी यांनी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने कामोठ्यातील गल्लीबोळातून हातात वाहतुकीच्या नियमांचे सचित्र फलक घेऊन व घोषणा देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने पथनाट्यसुद्धा ठिकठिकाणी सादर केले. या रॅलीला नागरिकांनी उस्फूर्त असा प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्यक्त केले. या रॅलीत सुमारे 200 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता.