निर्जीव भिंती बोलू लागल्या ; पर्यटकांचे लक्ष वेधण्यासाठी राबवला उपक्रम
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान पर्यटनस्थळी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी निर्जीव भिंतींवर स्वच्छतेविषयी चित्र रेखाटून आणि सुविचाराने भिंती बोलक्या केल्या जात आहेत. माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने हा उपक्रम सुरू करून स्थानिकांना तसेच येणार्या पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने स्वच्छता करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जातो. एकूण 54 किलोमीटरच्या परिघामध्ये मनुष्यबळावर स्वच्छता करणे शक्य नसल्याने नगरपालिकेकडून भिंतीवर चित्र रेखाटून स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे. वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यामंदिर, उद्याने, घरांच्या भिंती, दुकानाच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारे चित्र रेखाटून निसर्ग आपला सोबती असल्याचे सुविचार लिहून जनजागृती केली जात आहे. माथेरानमध्ये आलेले पर्यटक त्यांच्याकडील पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व खाण्यासाठी आणलेल्या पदार्थांवरील प्लास्टिकचे रॅपर कचराकुंडीत न टाकता नकळतपणे जंगलात किंवारस्त्यावर टाकतात त्यांनी तसे न करता पालिकेच्या कचराकुंड्यांचा वापर करावा,असे आवाहन माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने केले आहे.
पालिका स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. हे सर्वश्रुत आहे. कारण माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने मनुष्यबळ वापरून कचरा संकलित केला जातो. पण सगळीकडे कर्मचार्यांना पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे कचरामुक्त माथेरान करण्यासाठी पालिकेकडून भिंतीचित्राद्वारे जनजागृती केली जात आहे. तसेच पॉईंटवर असलेल्या दुकानदारांनी स्वतःची कचराकुंडी ठेवून कचरामुक्त माथेरानसाठी हातभार लावला आहे.
संजय शिंदे,
दुकानदार, इको पॉईंट
माथेरानमध्ये स्वच्छतेसाठी भिंतींचा उपयोग करून जनजागृती करीत आहोत.सर्व पॉईंट्सवर कचराकुंड्या बसवलेल्या आहेत .हे पर्यटनस्थळ आपले स्वतःचे समजूनच कचरामुक्त ठेवा. पर्यावरण मित्र बनून आपण सार्यांनी कचरामुक्त माथेरान करूया.
राहुल इंगळे,
प्रशासक तथा मुख्याधिकारी
माथेरान