अकोल्यात जाहीर सभांमधून प्रचाराचा धुरळा!

| अकोला | वृत्तसंस्था |

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. जाहीर सभांमधून प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस व वंचितचादेखील सभांमधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात (दि.26) एप्रिलला दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे. मतदारसंघात परंपरेनुसार पुन्हा एकदा तिरंगी लढत आहे. भाजपचे धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचितचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अटीतटीचा सामना असल्याचे दिसून येते. तिन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे. प्रमुख उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी, मेळावे, कॉर्नर सभा, बैठकांसह जेवणावळी उठवण्यात आल्या. पहिल्या टप्प्यातील मतदान (दि.19) एप्रिलला पार पडल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार्‍या मतदारसंघांकडे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील वरिष्ठ नेत्यांनी मोर्चा वळवला आहे.

धोत्रे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नियोजित सभा रद्द करण्यात आली. आता धोत्रे यांच्या प्रचारासाठी (दि.23) एप्रिलला देशाचे गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा अकोल्यात दाखल होणार आहेत. काँग्रेस उमेदवार डॉ. पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभा घेतल्या आहेत. वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात असल्याने ते स्वत:च प्रचार सभा घेऊन मतदारांना साद घालत आहेत. त्यांच्यासाठी प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आता जाहीर प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असून प्रचार तोफा जोरदार धडाडत आहेत.प्रचार सभांमधून प्रमुख तिन्ही उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र देखील सुरू आहे. भाजपकडून विकासात्मक मुद्यांसह जोर दिला गेला, तर काँग्रेस व वंचितची प्रचार मोहीम मतदारसंघातील समस्या व प्रश्‍नांभोवती केंद्रीत आहे.

Exit mobile version