लोकसहभागातून पालटले शाळेचे रुपडे

इनरव्हील क्लब बॉम्बे वेस्टचा पुढाकार
| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील वर्‍हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील घोडपापड जिल्हा परिषद शाळेचे रुपडं इनरव्हील क्लब बॉम्बे वेस्ट यांच्या पुढाकारातून पालटले आहे. शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. इनर व्हील क्लब बॉम्बे वेस्ट यांनी आतापर्यंत शाळेला 11 लाखांहून अधिक रुपयांचा खर्च केला असून, यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालय, किचन शेड, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान, नवीन वर्गखोली, तसेच शाळा रंगरंगोटीचे काम करण्यात आले आहे.

याचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा क्लबच्या अध्यक्षा सेजल रावल, सेक्रेटरी डॉक्टर कविता रेगे, वर्‍हाड – जांभूळपाडा ग्रामपंचायत सरपंच श्रद्धा कानडे , उपसरपंच महेश गिरी सदस्य सुनील वाघमारे माजी सदस्य काशिनाथ पवार, आदिच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. घोडपापड येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. एक वर्षापूर्वी शाळेला भेट दिल्यानंतर मला व माझ्या टीमला घोडपापड शाळेत काम करावेसे वाटले होते. घोडपापड या आदिवासी वाडीवरील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळेचे रूपडे पालटल्याचे इनरव्हील क्लब बॉम्बे वेस्टच्या अध्यक्षा सेजल रावल म्हणाल्या.

जांभूळपाडा ग्रामपंचायत सरपंच श्रद्धा कानडे यांनी शाळेसाठी माझ्याकडुन जेवढे सहकार्य करता येईल, तेवढे करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मात्र, इनरव्हील क्लब बॉम्बे वेस्टच्या पुढाकाराने घोडपापड शाळेचे बदलले रूप पाहताना मला खूप आनंद होत आहे. मुलांना चांगले शिक्षण आता शाळेत मिळेल. खेळाच्या मैदानावर मुले आता विविध खेळ आनंदाने खेळतील. इतके सुंदर खेळाचे मैदान झाले आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी जांभूहपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद पाटील, सुरेश तुरे, ज्येष्ठ शिक्षक सुरेश ठोंबरे, किशोर पाटील, मनसजन कोकणी, समीर भांड, ज्ञानेश्‍वर चाटे, आशा शिंदे, सागर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्यासह खाऊ वाटप करण्यात आले. उपस्थितांचे आभार उपशिक्षक श्रीकांत फुंदे यांनी मानले.

Exit mobile version