। नवी मुंबई । वार्ताहर ।
‘परीक्षांचे दिवस’ या पत्रकार राजेंद्र घरत लिखित ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन 25 जून रोजी घराडी, मंडणगड येथील स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य डॉ. अजित मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. घरत यांचे हे ब्रेल लिपीतील विसावे पुस्तक असून, ते गेल्या तेवीस वर्षे लिहीत असलेल्या मुशाफिरी या लेखमालेतील निवडक लेखांचे हे ब्रेल रुपांतर आहे.
याप्रसंगी डॉ. मगदूम म्हणाले की, घरत यांचे लेखन कायम नैतिकतेला धरून असल्याचा अनुभव मी त्यांचा एक वाचक म्हणून घेतला आहे. त्यांनी या शाळेत मला आणल्याने निसर्गाने अन्याय केलेल्या या मुलांमधील चैतन्य मलाही जाणवले. या मुलांच्या विविध कलागुणांचे डॉ. मगदूम यांनी कौतुक केले. पुस्तक प्रकाशनानंतर आपले मनोगत व्यक्त करताना लेखक राजेंद्र घरत म्हणाले, की मी भाग्यवान आहे की डोळे असलेल्या वाचकांप्रमाणेच या ब्रेल लिपीमुळे माझे लेखन दृष्टीहीन मुलामुलींपर्यंतही पोहोचत आहे.
गेली जवळपास अडीच वर्षे मला करोना काळातील निर्बंधांमुळे स्नेहज्योती शाळेत येऊन या मुला-मुलींना भेटता येत नव्हते. आता हे अडसर दूर होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या या दुर्गम भागातील या शाळेत आल्यानंतर या मुलामुलींच्या चेहर्यावरील आनंद व शिकण्याची जिद्द पाहिल्यानंतर आम्हा शहरी लोकांना तेथील दगदगीचा विसर पडतो व येथून मोठी ऊर्जा घेऊन आम्ही परततो. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता, यश स्नेहा संस्थेच्या अध्यक्ष आशा कामत, पेण येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते बजरंग पाटील, नाट्यप्रेमी सुधाकर पाटील आदी उपस्थित होते. उत्तम जैन यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी येथील विद्यार्थ्यांकरिता बजरंग पाटील यांनी गणवेश वितरीत केले.