। कर्जत । वार्ताहर ।
कर्जतचे रहिवासी आकाशवाणी मुंबईचे निवेदक कविवर्य दिनेश अडावदकर यांच्या माझे इंद्रधनू या ग्रंथाली मुद्रण सुविधा केंद्र निर्मित कवितासंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार आणि ज्येष्ठ साहित्यिक, लेखक दिनकर गांगल यांच्या हस्ते संपन्न झाला.
महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून वाशी नवी मुंबई येथील साहित्य संघ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर संगीतकार कौशल इनामदार, ज्येष्ठ साहित्यिक, लेखक दिनकर गांगल, साहित्य संस्कृती व कला मंडळ वाशीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, पदाधिकारी दिलीप जांभळे, प्रा.अनुपमा कुलकर्णी, प्रा. मृदुला गडणीस आणि कविवर्य दिनेश अडावदकर उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे संगीतकार कौशल इनामदार यांनी वेेगवेगळ्या प्रसंगातून कवीला कविता कशी भेटत जाते हे स्पष्ट करतांना कला आवडो वा न आवडो पण ती खरी असायला हवी असे सांगितले. दिनकर गांगल यांनी वाचनातून माणूस कसा ओळखता येतो हे फार सुंदर शब्दात स्पष्ट केले. प्रा. मृदुला गडणीस यांनी महाकवी कालिदासाच्या साहित्याचा वेध घेत मेघदूत या महाकाव्याची व त्याच्या मराठी अनुवादाची वैशिष्ट्ये उलगडली. सुभाष कुलकर्णी यांनी मंडळाच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी कविवर्य दिनेश अडावदकर यांनी आषाढ सरी ही आपली कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात स्वरार्चना मुंबई निर्मित मान्यवर अभिजात कवींच्या रचनांवर आधारित मघनु बरसे शब्दांचा या संगीतमय कार्यक्रमाने करण्यात आली. भगवान दबडे आणि अर्चना अडावदकर या गायक कलाकारांना संवादिनीवर पुंडलिक कोल्हटकर, तबला आशिष राणे आणि साईड र्हीदमवर व्यंकटेश कुलकर्णी यांनी साथ संगत केली. दीप्ती लेले आणि प्रिती किरकीरे यांनी समयोचित व रसाळ निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
संगीत विशारद, संगीत शिक्षिका, किर्तनकार असलेल्या आपल्या आईच्या स्व.प्रभावती अडावदकर यांच्या चरणी समर्पित केलेल्या या कविता संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमाला कविवर्य दिनेशचे 85 वर्षीय वडील प्रभाकर अडावदकर, डॉ.संतोष जाधव, उमा दिक्षीत, श्रीराम केळकर, प्रा.नितीन आरेकर,राजू पोतदार, संजय मालगुंडकर, जोशी, सुनिल भोपतराव, प्रशांत उगले,वर्षा पाठारे, सुनिता देशमुख, पराग दातार, मनिषा दातार, प्रद्युम्न दातार, सुचिता जोगळेकर, सुभाष नातू,आरोह अडावदकर, अक्षद अडावदकर, अपर्णा बाम व मोठ्या संख्येने आप्तेष्ट, मित्र परिवार उपस्थित होते.







