सात हजार चालकांकडून 13 कोटींचा दंड वसूल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
धुराच्या वाढत्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. पर्यावरणावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे वाहनांचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) न काढणाऱ्या चालकांना पनवेल येथील प्रादेशिक परिवहन विभागाने दणका दिला आहे. एप्रिल 2025 ते जून 2026 या पंधरा महिन्यांत सात हजार 864 चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून 13 कोटी 44 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यात वाहने खरेदीचा क्रेझ वाढत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या दुचाकींसह अन्य वाहने बाजारात उपलब्ध आहेत. दुचाकी वाहने खरेदीसह चारचाकी, तीनचाकी व अन्य अवजड वाहने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात. जिल्ह्यात पर्यटनासह औद्योगिकीकरणामुळे वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. मात्र, वाहन चालवित असताना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष केले जात. वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघण्याचा धोका निर्माण झाला आहे. मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. तरीदेखील अनेकजण नियमांचे उल्लंघन करून पीयूसी अर्थात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र न काढता वाहन चालवित आहेत.
केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 115 व 116 अंतर्गत वाहनामधून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण व त्याबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा थेट आणि गंभीर परिणाम मानवी आरोग्य व पर्यावरणावर होत असल्याने, उच्च न्यायालयानेदेखील या संदर्भात अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांची निर्धारीत कालावधीनंतर मान्यताप्राप्त संगणकीय प्रदूषण नियंत्रण केंद्रांमार्फत ऑनलाइन पद्धतीने प्रदूषण नियंत्रण चाचणी करून घेणे व त्याचे वैध प्रमाणपत्र सोबत बाळगणे कायदेशीररित्या अनिवार्य आहे, अशी सक्त सूचना प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे पनवेल येथील प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वायुवेग पथकामार्फत एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत एकूण 6 हजार 598 इतक्या वाहनांवर कारवाई करुन 13.19 कोटी रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. एप्रिल 2026 ते जून 2026 या कालावधीत एकूण एक हजार 266 वाहनांवर कारवाई करुन 25.32 लाख इतका दंड आकारण्यात आला आहे. या पंधरा महिन्यांच्या कालावधीमध्ये 13 कोटी 44 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अज्ञयावत करा
पर्यावरण रक्षणासाठी आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या वाहनांचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र त्वरित अद्ययावत ठेवावे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अद्ययावत नसणाऱ्या तसेच रस्त्यांवर संशयास्पद वाटणाऱ्या प्रदूषक वाहनांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पनवेलमधील प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे.
