21 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आवास येथील विविध कामांची माहिती मागविण्यात आली होती. माहितीच्या अधिकारानुसार ही माहिती देण्यास विलंब केल्याचा ठपका आवासचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी नारायण तुकाराम म्हात्रे यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्याविरोधात माहिती आयुक्त यांनी कारवाई करून 21 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच, माहितीच्या शुल्कातील केलेला 2 हजार 530 रुपयांचा भरणा अपिलार्थी यांना परत करण्यात यावा, असे लेखी आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आवासच्या ग्रामसेवकाला दणका मिळाला आहे.
अलिबाग तालुक्यातील आवास येथील ग्रामस्थ मच्छिंद्र कवळे यांनी, ग्रामपंचायत टॅक्स फी किंवा इतर येणे असलेल्या रकमेबाबत सविस्तर माहिती मिळावी. तसेच, 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत संबंधित विषयांकीत प्रकरणे, 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2021 मध्ये एकूण येणे असलेल्या मिळकतघर, खातेकर यांची सविस्तर माहिती, टॅक्स फी येणे करीता वाटप केलेले एकूण बीलांची साक्षांकीत प्रत मिळावी यासाठी दि.19 एप्रिल, 2022 मध्ये माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती. मात्र, ही माहिती ग्रामविकास अधिकारी म्हात्रे यांनी मुदतीत न दिल्याने राज्य माहिती आयुक्त यांच्या दालनात यावर सुनाववणी झाली. अखेर ग्रामविकास अधिकारी म्हात्रे यांच्यावर विलंबाचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी नारायण तुकाराम म्हात्रे (सेवा निवृत्त) यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक आहे. त्यामुळे त्यांचा खुलासा अमान्य करण्यात येत आहे. त्यांना 15 ऑक्टोबर, 2025 रोजीच्या आदेशातील माहितीचा अधिकारी अधिनियम 2005च्या कलम 20(1) अन्वये दिलेली कारणे दाखवा नोटीस कायम करण्यात येत असून त्यांच्यावर 21 हजार रुपयांची शास्ती लादण्यात येत आहे. तसेच, अपिलार्थी कवळे यांनी ग्रामपंचायतीकडे माहितीसाठी केलेला 2 हजार 530 रुपयांचा भरणा 30 दिवसांच्या आत धनादेशाद्वारे परत करण्यात यावा, असे आदेश काढण्यात आले आहेत. या कारवाईमुळे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना दणका मिळाला आहे.
