शेतकऱ्यांना घरबसल्या आगाऊ नोंदणीची सुविधा
| माणगाव | प्रतिनिधी |
शेतकऱ्यांना खत खरेदी करताना होणारा त्रास, लांबच लांब रांगा आणि खताच्या उपलब्धते बाबतची अनिश्चितता दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘खत विक्री चौकट’ (एफएफएस) ही भ्रमणध्वनी प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या भ्रमणध्वनीवरून घरबसल्या आवश्यक खताचे आगाऊ आरक्षण करता येणार असून, आरक्षण केलेले खत निश्चित कालावधीत जवळच्या अधिकृत विक्रेत्याकडून घेता येणार आहे.
माणगाव तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या प्रक्रियेमुळे खत खरेदी अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून, जवळच्या विक्रेत्याकडे उपलब्ध असलेले खत आगाऊ आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी दुकानांबाहेर होणारी गर्दी आणि लांब रांगा कमी होण्यास मदत होईल. तसेच पिकाच्या गरजेनुसार वेळेत खत उपलब्ध झाल्याने शेतीतील कामांचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे. शेतकऱ्यांना खतापासून वंचित राहावे लागू नये आणि प्रत्येक वैयक्तिक तसेच कुटुंबातील शेतकऱ्याला नियमानुसार खताचा लाभ मिळावा, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे. खताचे आगाऊ आरक्षण करण्याबाबत अडचण किंवा अधिक माहिती आवश्यक असल्यास शेतकऱ्यांनी जवळच्या पंचायत समितीतील कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच गावातील कृषी सखी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माणगाव तालुका कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारी करावी, असे आवाहन माणगाव तालुका कृषी अधिकारी किरण पडवळकर यांनी केले आहे.







