माथेरान पालिकेवर पुन्हा भगवा फडकवा

। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान पालिकेवर भगवा फडकला पाहिजे हे पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पहायचे आहे, असे प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले. माथेरान नगरपरिषद मधील कर्मचारी वर्गाने शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेची कामगार युनियन स्वीकारली आहे.त्या कामगार युनियनच्या नामफलकाचे अनावरण शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि खासदार,माजी केंद्रीय मंत्री,भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांचे हस्ते झाले. माथेरान मधील श्रीराम चौकात नामफलकाचे अनावरण प्रसंगी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, भरत भगत, चंद्रकांत चौधरी, प्रसाद सावंत, जांभळे,माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी,माजी उपनगराध्यक्ष हिरावती सकपाळ, जाधव, रत्नदीप प्रधान,सागर पाटील, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर येथील कुमार प्लाझा हॉटेल येथे शिवसेना मेळावा आणि कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अरविंद सावंत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना माथेरान ही आमच्या महाराष्ट्राची मान आहे आणि शिवसेनेची शान आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सांगणे राहिले आहे.त्यामुळे माथेरानकरांनी शिवसेनेची साथ कायम दिली पाहिजे असे आवाहन सावंत यांनी केले. कामगार संघटनेच्या युनिटमध्ये अध्यक्ष म्हणून रत्नदीप प्रधान, उपाध्यक्ष सागर पाटील,सचिव अनिल नाईकडे यांची तर कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अवधूत येरफुले,सह कार्याध्यक्ष रमेश जोशी,तर सहसचिव नरेश पुरबिया,सह खजिनदार सचिव छगन पूरबिया यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. त्यांना भारतीय कामगार सेनेच्या युनिटचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रत्नदीप प्रधान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

Exit mobile version