फेरीवाल्यांवर नियमित तपासणीची मागणी; नागरिकांनी सावध राहण्याची गरज
| उरण | प्रतिनिधी |
एप्रिलच्या वाढत्या उकाड्यामुळे उरण तालुक्यात शीतपेय विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लिंबूपाणी, सरबत, ताक, लस्सी आणि फ्रूट सॅलडसारख्या पेयांकडे नागरिकांचा ओढा वाढत असला, तरी या पेयांच्या दर्जाबाबत गंभीर शंका व्यक्त होत आहेत.
रस्त्यावर विक्री होणाऱ्या बहुतांश शीतपेयांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. ताक व लस्सी तयार करताना वापरले जाणारे दूध, दही व पाणी यांची गुणवत्ता तपासली जात नसल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी वापरला जाणारा बर्फ हा अनधिकृत कारखान्यांमधून आणला जात असल्याची बाबही समोर आली आहे.
काही विक्रेत्यांकडून सरबतामध्ये कृत्रिम रंग व स्वाद मिसळले जात असल्याचे आढळून आले आहे. तर फळांच्या नावाखाली विकले जाणारे फ्रूट सॅलड हे जुन्या फळांपासून बनवले जात असल्याचे आरोग्य विभागाच्या निरीक्षणात आले आहे. यामुळे अतिसार, पोटदुखी, टायफॉईडसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दरांच्या बाबतीत पाहता, हे पदार्थ नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत.
लिंबूपाणी 10 ते 20, सरबत 15 ते 30, ताक 10 ते 25, लस्सी 30 ते 60, तर फ्रूट सॅलड 30 ते 80 दरम्यान विकले जात आहे. दर कमी असले तरी दर्जावर प्रश्नचिन्ह असल्याने नागरिकांनी सावध राहण्याची गरज व्यक्त होत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना घरगुती किंवा विश्वासार्ह ठिकाणचीच पेय पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने फेरीवाल्यांवर नियमित तपासणी करून स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे लागू करावेत, अशी मागणीही होत आहे. उष्णतेपासून दिलासा देणारी ही पेयेच, निष्काळजीपणामुळे आजाराचे कारण ठरू नयेत, यासाठी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही सजग राहणे आवश्यक आहे.
आरोग्यासाठी घातक घटक
अनेक शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त, एस्पार्टम सारखे कृत्रिम गोडवे वापरले जातात. शीतपेयांमध्ये बेंझोइक ऍसिड आणि सॉर्बिक ऍसिड यांसारखे रासायनिक संरक्षक वापरले जातात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
