। नवीन पनवेल । वार्ताहर ।
सिडको वसाहतीत पावसाळी गटारे आणि नालेसफाईची कामे जोरात सुरू आहेत. या नाल्यांमध्ये माती आणि इतर टाकाऊ वस्तू आढळून येत आहेत. मात्र कळंबोली वसाहत व स्टील मार्केटमधील गटारांमध्ये चक्क प्लास्टिकच्या पिशव्या, बिअर व दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे आढळून आले. त्यामुळे प्लास्टिकबंदी राबवूनही कोणताही लाभ होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
26 जुलै 2005 रोजी आलेल्या महाप्रलयास प्लास्टिकही कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले होते. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते नाल्यात जाऊन अडकते. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांच्या पात्रात पिशव्या साचल्याने पावसाचे पाणी तुंबून ते रस्त्यावर व घरात शिरण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले. त्यामुळे 23 जून 2018 पासून राज्यात प्लास्टिकबंदी आदेश लागू झाले. त्याला आता जवळपास तीन वर्षे होत आहेत; मात्र त्यानंतरही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच असल्याचे आढळून आले आहे. मोकळे भूखंड, महामार्ग आणि रस्त्यांच्या कडा, नाले आणि गटारात प्लास्टिक निदर्शनास येत आहे. राज्य सरकारने बंदी आणली असली, तरी आजही अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर दिसून येत आहे. हे प्लास्टिक नाले आणि गटार साचताना दिसत आहे.
प्लास्टिक बंदीवर प्रश्नचिन्ह
