सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिंन्ह
| माथेरान | प्रतिनिधी |
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ई-रिक्षाचा दुसरा पथदर्शी प्रकल्प मंगळवारपासून सुरु झाला. ई-रिक्षा सुरु करण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षा संघटनांनी संघर्ष उभारला होता. त्यांच्या बारा वर्षाच्या परिश्रमाला अखेर यश आले आहे. परंतु ज्या हातरिक्षा चालकांनी यासाठी प्रयत्न केले, त्यांना सरकारने या ई-रिक्षा न देता ठेकेदाराची नेमणूक केली आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा हातरिक्षा ओढायच्या का, असा सवाल उपस्थित केला आहे. याविरोधात लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याने पेच निर्माण झाला आहे.
पुढील एक वर्ष आता माथेरानच्या रस्त्यावरुन ई-रिक्षा धावणार आहे. आजपासूनच वन ट्री हिल विभागातील लोकांनी या महत्वपूर्ण सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली. केवळ अडीच किलोमीटर अंतरासाठी प्रतिमानसी 35 रुपये इतका दर आकारण्यात येत आहे. ई-रिक्षाची निविदा म्हणजे एकप्रकारे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्याने सध्यातरी या सात ई-रिक्षांच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयांची आवक मिळणार असल्याचे दिसून येते. त्यासाठीच ठेकेदारामार्फत आपले उखळ पांढरे करण्यासाठी काही अधिकारी यांचा सुध्दा यात समावेश आहे का, अशा चर्चेला उधाण आले आहे.
हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी, त्यांना आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळावी, यासाठी गेल्या 12 वर्षापासून संघर्ष सुरू आहे. अखेरीस 22 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला न्यायालयाने पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले.
हातरिक्षा चालकांनाच ई-रिक्षा द्यायच्या आहेत, असे असतानदेखील जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी माथेरान यांना पालिकेच्या सात ई-रिक्षा ठेकेदारामार्फत चालविण्यास सांगितले आहे. हे फार दुर्दैवी आहे. पथदर्शी प्रकल्पामध्ये आम्हाला संधी देणे गरजेचे आहे.
सुनील शिंदे, ई-रिक्षा याचिकाकर्ते, माथेरान
आम्हाला आमच्या व्यवसायात बदल घडवून आणायचा होता. जेणेकरून आमची या गुलामगिरीमधून मुक्ती होईल. त्यासाठी पर्यावरणपूरक ई-रिक्षा हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्यासाठी आम्ही जवळपास बारा वर्षे पाठपुरावा केला आहे आणि आता या रिक्षा सरकारनेे ठेकेदाराला देऊन आमची उपासमार सुरू केली आहे. लवकरच या ई-रिक्षा आम्हाला मिळाल्या नाहीत, तर आम्ही सर्व तीव्र आंदोलन करणार आहोत. नगरपरिषदेने ठेकेदाराला आयत्या ई-रिक्षा दिल्या आहेत. आम्ही काय आता पुन्हा हातरिक्षा ओढायच्या का?
रुपेश गायकवाड, हातरिक्षा चालक
दरम्यान, नगर परिदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याशी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.