| कर्जत | प्रतिनिधी |
माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या प्रशासकीय नोंदींच्या जतनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. डिसेंबर 2023 पासून मुख्याधिकाऱ्यांची दैनंदिनी, भेट नोंदवही, हालचाल नोंदवही आणि शासकीय दौऱ्यांच्या नोंदी मागविण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित माहिती नगरपरिषदेच्या अभिलेखात आढळून आली नसल्याचे अधिकृत उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन हालचाली तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या शासकीय दौऱ्यांचा अधिकृत मागोवा कसा ठेवला जात होता, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने यांनी दि.27 मे रोजी माहिती अधिकाराचा अर्ज माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेत दाखल करून मुख्याधिकाऱ्यांची दैनंदिनी, भेट नोंदवही, हालचाल नोंदवही आणि शासकीय दौऱ्यांच्या नोंदींची साक्षांकित प्रती मागितल्या होत्या. त्याशिवाय या नोंदवही अद्ययावत ठेवण्यासंदर्भातील शासन नियम, अटी व परिपत्रकांच्या प्रतींची मागणी केली होती. मात्र, दि.30 जुलै रोजी नगरपरिषदेच्या जनमाहिती अधिकाऱ्याने, संबंधित माहिती अस्तित्वात नसल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले नसून, या कार्यासनाच्या अभिलेख्यात आढळून आली नाही, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे या शब्दप्रयोगातून काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत आहे. तर, संबंधित नोंदी तयारच करण्यात आल्या नव्हत्या का? त्या अन्य विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत का? अभिलेख जतन प्रक्रियेत काही त्रुटी झाली आहे का? किंवा सध्या त्या शोधण्यात अपयश आले आहे का? याचा स्पष्ट खुलासा होणे आवश्यक असल्याची मागणी देखील करणार असल्याचे दिगंबर चंदन यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यासाठी संबंधित कालावधीतील मूळ अभिलेख, आवक-जावक नोंदी, दौरा मंजुरी, प्रवासभत्ता बिले, लेखा कागदपत्रे, उपस्थिती नोंदी आणि इतर संबंधित दस्तऐवजांची पडताळणी केल्यास वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होऊ शकते, अशी भूमिका अर्जदारांकडून व्यक्त होत आहे.
नगरपरिषदेच्या प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
