| माथेरान | वार्ताहर |
माथेरान गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून उरणचे वर्ग ‘ब’चे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्च पासून माथेरान पालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त होते. 1 जानेवारी 2022 मध्ये माथेरान पालिकेचे सदस्य मंडळाची मुदत संपली होती. त्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे पालिका मुख्याधिकारी आणि प्रशासक पदाची जबाबदारी नगरविकास विभागाने दिली होती. प्रशासक म्हणून 14 महिने कामकाज केल्यानंतर सुरेखा भणगे यांची प्रशासकीय बदली पुणे महापालिका येथे झाली आहे. त्यामुळे मार्चपासून माथेरान पालिकेचा कारभार प्रभारी मुख्याधिकारी म्हणून सुरू होता.
प्रभारी मुख्याधिकारी यांच्याकडे प्रशासक पदाचीही जबाबदारी होती. कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी दिली होती. आता 1 डिसेंबरला माथेरान गिरिस्थान नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून राहुल इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंगळे यांनी 4 डिसेंबरपर्यंत पदभार स्वीकारावा, असे सूचित केल्याने सोमवारी नगरपालिका कार्यालयात हजर होणार असे माथेरानकरांकडून बोलले जात आहे.