राहुल गांधींची ठाकूर कुटुंबियांशी आपुलकीची भेट

राजाभाऊ ठाकूर यांच्या कुटुंबियांशी साधला मनमोकळा संवाद
नव्या पिढीच्या विचारांनाही दिले महत्त्व

| नाशिक | प्रतिनिधी |

काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी नाशिकमध्ये आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दक्षिण रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ मधुकर ठाकूर यांच्या कुटुंबियांची विशेष भेट घेतली. वर्षानुवर्षे काँग्रेससाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानामागे त्यांच्या कुटुंबियांचाही त्याग असतो, याची जाणीव ठेवत राहुल गांधी यांनी ठाकूर कुटुंबियांशी आपुलकीने संवाद साधला. या अनौपचारिक भेटीने ठाकूर कुटुंबीय सुखावले.

राहुल गांधी यांनी समीर उर्फ हुनी ठाकूर, सम्राट राजेंद्र ठाकूर, संजुक्ता संजय अनुभवणे, मीनाक्षी मधुकर ठाकूर, प्राची राजेंद्र ठाकूर आणि कुबेर रवींद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी राजाभाऊ ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते.

या भेटीत राहुल गांधी यांनी औपचारिकतेच्या पलीकडे जात कुटुंबातील सदस्यांचे अनुभव, विचार आणि अपेक्षा जाणून घेतल्या. विशेषतः तरुण सदस्यांशी संवाद साधताना त्यांच्या प्रश्नांना आणि नव्या पिढीच्या दृष्टिकोनाला त्यांनी महत्त्व दिले. त्यामुळे ही भेट राजकीय नेत्याची औपचारिक भेट न राहता कुटुंबातील व्यक्तींशी झालेल्या आपुलकीच्या संवादासारखी ठरली.

राजाभाऊ ठाकूर यांच्या कुटुंबियांची राहुल गांधी यांनी घेतलेली भेट दक्षिण रायगड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठीही विशेष ठरली आहे. कार्यकर्त्याच्या राजकीय योगदानासोबतच त्याच्या पाठीशी उभ्या असलेल्या कुटुंबाचा सन्मान करण्याचा संदेश या भेटीतून मिळाल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

‌‘जेन-झी‌’च्या विचारांवरही चर्चा
आजच्या तरुणांचे प्रश्न, राजकारणाकडून त्यांच्या अपेक्षा आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीबाबतची त्यांची भूमिका याविषयीही राहुल गांधी यांनी संवाद साधला. पुण्यातील ‌‘छात्रों की गूंज‌’ कार्यक्रमानंतर तरुणाईमध्ये, विशेषतः मुलींमध्ये राहुल गांधी चर्चेचा विषय ठरल्याची प्रतिक्रिया कुटुंबियांनी व्यक्त केली. महिलांच्या आणि मुलींच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबतही यावेळी चर्चा झाली.
Exit mobile version