। पनवेल । प्रतिनिधी ।
करंजाडे येथील सेक्टर 5 मध्ये सुरू असलेल्या जुगारावर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी जुगार चालविणाऱ्या एका व्यक्तीसह पैसे लावून जुगार खेळणाऱ्या 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान रोख रकमेसह विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 7 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास करंजाडे सेक्टर 5 येथील एक व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. यावेळी अन्य 10 जण दोन गटांत बावन्न पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या कारवाईत एकूण 11 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम आणि विवो, ओप्पो व सॅमसंग कंपन्यांच्या मोबाईल फोनचा समावेश आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 2 लाख 7 हजार 200 रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






