रेवदंडा पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या थेरोंडा खंडेरावपाडा, पो. चौल, ता. अलिबाग येथे मटका जुगार चालवणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 8 एप्रिल रोजी रात्री सुमारे 7.40 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र एकनाथ माहीमकर (62) रा. थेरोंडा खंडेरावपाडा, पो. चौल, ता. अलिबाग, जि. रायगड हा आपल्या घराच्या मागील नारळ-सुपारीच्या वाडीत मोकळ्या जागेत लोकांकडून पैसे स्वीकारून चिठ्ठ्यांवर आकडे लिहून ‘कल्याण मेन’ नावाचा मटका जुगाराचा धंदा बेकायदेशीररित्या चालवत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 600 रुपये रोख रक्कम, त्यामध्ये 500 रुपयांची एक नोट व 100 रुपयांची एक नोट, तसेच ओएक्स हाऊसेर कंपनीचा निळ्या शाईचा पेन जप्त केला आहे. आकडेमोडीशी संबंधित साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तक्रारदार सिद्धेश सुभाष शिंदे (32), पोलीस कर्मचारी, रेवदंडा पोलीस ठाणे यांनी दिली आहे. ही कारवाई सपोनि बी.के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार आर.के. थळे करीत आहेत.
