सागर सावंतचे 7 तर अभिषेक खातूचे 8 बळी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथे सुरू झालेल्या वरिष्ठ गटाच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी सामन्यात रायगडच्या संघाने एमसीव्हीएस या संघावर 14 धावांनी नाट्यमय विजय मिळविला.
नाणेफेक जिंकून रायगड संघाने फलंदाजी स्वीकारली. रायगडाचा पहिल्या डावात 52 धावतच आटोपला. एमसीव्हीएस संघाने पहिल्या डावात 136 धाव करून 84 धावांची आघाडी घेतली. रायगडाने दुसर्या डावात 191 धावा केल्या. सामना जिंकण्यासाठी एमसीव्हीएस संघाला दुसर्या डावात 108 धावा करायच्या होत्या. एमसीव्हीएस संघाचा दुसरा डाव 93 धावात गुंडाळून रायगडाने हा सामना 14 धावांनी जिंकला.
रायगडचा पहिला डाव 18 षटकांमध्ये अवघ्या 52 संपाला. नंतर एमसीव्हीएस संघाने 44 षटकांत 136 धावा केल्या व पहिल्या डावात 84 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. रायगड संघनायक सागर सावंत यानी 5 बळी घेतले. त्याला 4 बळी घेऊन अभिषेक खातू याने तोलामोलाची साथ दिली. रायगडच्या दुसर्या डावात 4 बाद 78 अशी धावसंख्या असतानाही खचुन न जाता रायगडने आपल्या दुसर्या योजनेनुसार धावपट्टीवर उभे रहात छोट्या छोट्या भागीदार्या करत सर्व बाद 191 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. 7 व्या गड्याकरता सिद्धांत म्हात्रे व हार्दिक कुरंगळे यांनी 43 चेंडूत 26 धावा, 8 व्या गड्याकरता हार्दिक व अभिषेक खातू यांनी 138 चेंडूत 35 धावा तसेच 9 व्या गाड्या करता अभिषेक व संघनायक सागर सावंत यांनी केवळ 73 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. अभिषेक खातू नाबाद 32 व सागर सावंत यानी 29 धावा केल्या. अशाप्रकारे एमसीव्हीएस संघाला चौथ्या डावात 108 धावांचे लक्ष दिले गेले.
सागर सावंत याने आपल्या दुसर्या व संघाच्या तिसर्या षटकामध्ये 0 धावांवर पहिला बळी मिळवून सुरुवात छान करून दिली. दुसर्या बाजूने डावखुरा फिरकी गोलंदाज सिद्धांत म्हात्रे हा गोलंदाजी करत होता. त्याने पहिली सातही षटकं निर्धाव टाकून एक बळीही घेतला. त्यामुळे एमसीव्हीएमच्या फलंदाजांनवर दडपण आले. त्यांचा डाव कोसळला व त्यांचे 6 फलंदाज 31 धावात गारद झाले. त्यानंतर सातव्या गाड्या करता 34 धावांची भागीदारी करत एमसीव्हीएस संघाने सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केले. नंतर पुन्हा दोन गडी झटपट बाद झाल्याने त्यांच्या संघाचा धावफलक 9 बाद 72 असा झाला शेवटच्या जोडीने प्रतिकार करताना 21 धावांची भागीदारी केली परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले व शेवटचा गडी 93 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे रायगड संघाचा 14 धावांनी विजय झाला.
संपूर्ण सामन्यात सागर सावंत 7 बळी व 35 धावा अभिषेक खातू 8 बळी व 36 धावा सिद्धांत म्हात्रे 3 बळी व 17 धावा या तिघांच्याही अष्टपैलू खेळामुळे रायगड ने एमसीव्हीएस संघाविरुद्ध विजय साकारला. अशा अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवल्याबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते व सर्व सभासद तसेच रायगडच्या सर्व क्रिकेटप्रेमींनी रायगड संघाचे अभिनंदन केले.