| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील कोर्टाच्या कर्मचार्यांची आरसीपीएल प्रिमियर लीग 2022 पेण नगरपालिकेच्या मैदानावर संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये महाड कोर्टाच्या कर्मचार्यांनी अंतिम विजेतेपद पटाकाविले.
सकाळी नऊच्या सुमारास आरसीपीएल 2022 प्रिमियर लीगचे उद्घाटन पेण दिवाणी फौजदारी न्यायाधीश रुबीना मुजावर यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेमध्ये एकूण दहा संघांनी सहभाग घेतला होता. दिवसभर ही किक्रेट लीग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अंतिम लढत ही महाड आणि पनवेल संघामध्ये झाली. महाड संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांत 48 धावा काढल्या. या 48 धावांचा पाठलाग करताना पनवेल संघ 7 विकेट्सच्या बदल्यात 34 धावाच करु शकला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड जिल्ह्याचे न्यायालयीन प्रबंधक अशोक लांगी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक महाड, द्वितीय क्रमांक पनवेल, तर तृतीय क्रमांक अलिबाग या संघाने पटकाविला.
या स्पर्धेचे मालिकावीर म्हणून महाड संघाचे प्रवीण म्हात्रे यांची निवड करण्यात आली. त्यांनादेखील सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अशोक लांगी यांनी सांगितले की, वर्षाच्या बाराही महिने न्यायालयीन कर्मचारी आपले काम प्रामाणिक करत असतात. आपले काम संभाळून अशाप्रकारे स्पर्धा घेऊन कामाचा तणाव कमी करत असतात. कामाचा तणाव कमी करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा होणे गरजेचे आहे. यावेळी न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे प्रवीण बांधिवडेकर यांनी सांगितले की, आज जी स्पर्धा झाली या स्पर्धेतून 16 खेळाडूंची निवड करण्यात येऊन कोल्हापूर येथे होणार्या किक्रेट स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघाचे नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रवीण बांधिवडेकर, समीर वाडेकर, दिनेश पाटील, सुरेश महाडिक आणि पेण न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली.