| सुधागड -पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी कातकरवाडी जवळील जंगलात शनिवारी (ता.9) एका महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेच्या पतीने पत्नी हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती. मात्र पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मृत महिलेच्या पतीची संशयास्पद वागणुक ओळखुन पोलीस खाक्या दाखविल्यावर त्याने आपणच पत्नीचा गळा आवळून खून केला असल्याचे कबूल केले. यासंदर्भात मंगळवारी (ता.12) पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, नवघर उंबरवाडी येथील डोंगराळ भागात आदिवासी लोकांना शनिवारी (ता.9) एक महिला मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले होते. ही घटना पाली पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचले. परंतु महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे मुश्किल होते. रविवारी (ता.10) रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व रोह्याच्या विभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, आरसीपी टीम, पाली पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी, फिंगरप्रिंट टीम, डॉक्टर व ग्रामस्थ अशी टीम घटनास्थळी जाऊन मृतदेहाचे नमुने घेऊन शवविच्छेदन करण्यात आले.
अज्ञात मृतदेहाचा तपास घेणे पोलिसांपुढे आवाहन होते. यादरम्यान आरड्याचीवाडी येथील आदिवासी महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती सागर पवार याने जांभूळपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.5) दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार यांच्या घरी जाऊन अज्ञात महिलेच्या अंगावरील कपडे त्या कुटुंबाला दाखवले. त्या कपड्यांच्या आधारावर ती अज्ञात महिला सागर पवारची पत्नी कुसबा पवार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्या महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली. मृत महिलेचा पती सागर पवार पोलिसांपासून काहीतरी लपवित असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी सागरची चौकशी करण्यास सुरुवात केली. अखेर सागरनेच त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केला असल्याचे कबूल केले.
नेमके कारण काय?
सागर याने सांगितले की, पत्नी कुसबा ही तिच्या बहीण व भावाला दिलेले पैसे परत करत नव्हती. तसेच वारंवार खर्चाकरिता पैसे मागत होती. सागरने दुसरे लग्न केले, या कारणाने त्याला मानसिक त्रास देत असल्याच्या रागाने सागरने पत्नीचा खून केला असल्याचे सांगितले.