वालेकरांचा पाठपुरावा यशस्वी
अलिबाग | वार्ताहर |
महाड येथे असलेले रायगड जिल्हा कामगार न्यायालय जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे आणले जाईल असे एका पत्रामार्फत जिल्हाधिकारी यांनी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांना कळविले आहे. या न्यायालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाईल असेही आपल्या पत्रात जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.
पूर्वी रायगड जिल्ह्याचे कामगार न्यायालय वागळे इस्टेट ठाणे येथे होते. पण शासनाने रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्याचे जाहीर केल्यानंतर या जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प चालू झाले. परिणामी कामागारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणून ठाणे येथील कामगार न्यालयालयाची इमारत अपुरी पडू लागली. अन्य गैरसोईही न्यायाची अपेक्षा करणार्या कामगारांना भेडसावू लागल्या. परिणामी रायगड जिल्ह्यासाठी वेगळ्या न्यायालयाची गारज भासू लागली. याबाबत माहिती गोळा केल्यानंतर रायगड जिल्ह्यात कामगार न्यायालयाची गरज असल्याचे वालेकर यांनी सरकारच्या निदर्शनास आणले. यासाठी विविध स्तरावर पाठपुरावाही केली.
त्यानुसार रायगड जिल्हा कामगार न्यायालय मंजूर झाले. पण तत्कालीन पालकमंत्री प्रभाकर मोरे यांनी जिल्हा मुख्यालयात सुरू होणारे कामगार न्यायालय महाड येथे चालू केले. पण महाड येथे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. उत्तर रायगडमध्ये राष्ट्रीय प्रकल्प जादा असल्यामुळे अशील वर्गही जादा आहे. म्हणून हे कामगार न्यायालय जिल्हा मुख्यालयात हलविण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे बळवंत वालेकर यांना कळताच त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या शी संपर्क साधला, न्यायालय अलिबाग या जिल्हा मुख्यालयात हलविण्याबाबत कार्यवाही करावी अशी विनंती केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा कामगार न्यायालय अलिबाग येथे स्थलांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरेशी जागा उपलब्ध आहे. सदर न्यायालय महाड येथून स्थलांतरित करण्यासाठी हरकत नसल्याबाबत मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड – अलिबाग यांना कळविले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.