पोलादपूर तालुका जिल्ह्यात प्रथम
| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज ( दि.8) जाहीर झाला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्याने 95.03 टक्के निकालाची नोंद करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा रायगड जिल्ह्यातून एकूण 35 हजार 217 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 33 हजार 469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचा निकाल 93.70टक्के लागला असून मुलींचा निकाल 96.44टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तालुकानिहाय निकालात पोलादपूर तालुक्याने 97.62 टक्के निकाला नोंदवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर पनवेल तालुक्याचा 95.94 टक्के, उरण तालुक्याचा 94.89 टक्के, कर्जत तालुक्याचा 96.91 टक्के, खालापूर तालुक्याचा 92.14 टक्के, सुधागड तालुक्याचा 89.98 टक्के, पेण तालुक्याचा 93.75 टक्के, अलिबाग तालुक्याचा 95.35 टक्के, मुरुड तालुक्याचा 94.59 टक्के, रोहा तालुक्याचा 94.35टक्के, माणगाव तालुक्याचा 94.50टक्के, तळा तालुक्याचा 96.29 टक्के, श्रीवर्धन तालुक्याचा 92.14टक्के, म्हसळा तालुक्याचा 93.06टक्के, महाड तालुक्याचा 96.96टक्के निकाल लागला आहे.
रायगड जिल्ह्याच्या दहावीच्या यशस्वी निकालामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांची मेहनत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याची भावना व्यक्त होत आहे.







