काकासाहेब कोयटे यांचे गौरवोद्गार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सहकार चळवळ वाढविण्यासाठी जिल्हा बँकेबरोबरच वेगवेगळ्या पतसंस्था, सहकार संस्थांनी योगदान दिले आहे. युनो ने 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्ताने राज्यात सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यासह कोकणात अलिबागपर्यंत ही दिंडी काढण्यात आली आहे. पतसंस्थाच्या चळवळीला जोश निर्माण व्हावा, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. सहकार चळवळीतील कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार चळवळीत रायगड जिल्हा अग्रेसर राहिला आहे. आंतरराष्ट्रीय दिनासाठी सर्व पतसंस्था, सहकार संस्थांची मदत होत असल्याचा आनंद आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड यांच्यावतीने अलिबागमध्ये सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शुक्रवारी(दि.31) ते बोलत होते.
यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपकार्यवाह सुरेश पाटील, गिरीष तुळपूळे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप व अन्य पदाधिकारी, सहकार चळवळीतील मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी कोयटे म्हणाले की, सकल राष्ट्रीय उत्पन्नात सहकाराचा वाटा 24 टक्के आहे. पतसंस्थांच्या अनेक समस्या आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांची गरज पुर्ण करण्यासाठी पतंससंस्था, व सहकाराचे योगदान राहिले आहे. सहकाराबाबत अविश्वासाचे वातावरण आहे, ते दुर करण्याबरोबरच सहकारात महिला व युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी राज्यात दोन ठिकाणी सहकार दिंडी सुरु करण्यात आली आहे. दुसरी दिंडी मुंबईतून काढण्यात आली आहे. कोकणासह अलिबागपर्यंत ही दिंडी असणार आहे. या सहकारी दिंडीचा समारोप शिर्डी येथे सहकार परिषदेच्या निमित्ताने होणार आहे. या आंतरराष्ट्रीय दिनासाठी रायगड जिल्हयातून हजारो सहकार चळवळीतील कार्यकर्ते सामील राहतील असा विश्वास आहे. सहकार चळवळीत जिल्ह्याचे योगदान मोलाचे राहिले आहे. सहकार चळवळ वाढविण्यासाठी जिल्ह्याने प्रचंड मेहनत घेतली आहे, असे कोयटे म्हणाले. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी यांच्यासह सुरेश पाटील, गिरीष तुळपुळे आदी मान्यवरांनीदेखील आपले मत व्यक्त केले.
सहकार दिंडीने अलिबाग बहरला
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने अलिबागमध्ये सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या दिंडीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हयातील सर्वच पतसंस्थांमधील पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचार्यांनी दिंडीमध्ये सहभाग घेतला. यावेळी सहकार चळवळीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी एक वेगळा उत्साह निमित्ताने पहावयास मिळाला. सहकार दिंडीने संपुर्ण परिसर बहरून गेला होता.