सोमनाथ घार्गे यांनी कृषीवलच्या वृत्ताची घेतली दखल
| रायगड | खास प्रतिनिधी |
नाशिकमधील हवालाकांडाची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरु आहे. या हवालाकांडाचे कनेक्शन रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत आल्याचे वृत्त कृषीवलने प्रकाशित केले होते. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यात येत असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कृषीवलशी बोलताना दिली.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा हवालाकांड झाल्याचा आरोप केला होता. हा हवालाकांड नाशिक मर्चंट बँकेत झाला असून, हवालाकांडमधील एक हजार कोटींहून अधिकची रक्कम वोट जिहादसाठी वापरल्याचा आरोपी सोमय्या यांनी केला होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अटकेचे सत्र राबवले. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. संबंधित आरोपी दुबईला विमानाने पळून जात होते, पण त्यांचा हा मनसुबा पोलिसांनी उधळून लावत त्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली होती. त्याच हवालाकांडाचे हे कनेक्शन आहे की अन्य कोणत्या? त्यानुसारच अलिबागमध्ये एका व्यक्तीला पोलिसांनी नोटीस बजावल्याची माहिती कृषीवलने उघड केली होती. सदरच्या दोन्ही व्यक्तींपैकी एक व्यक्ती अलिबाग शहरातील आहे, तर अन्य एक व्यक्ती शिवाजीनगर परिसरातील असल्याची माहिती आहे.
सदरचा व्यक्तीकडे अनेकांच्या बँक खात्याचा तपशील आढळून आला. विविध बँक खात्यातून सुमारे 10 कोटींहून अधिकच्या रकमेचे व्यवहार झाल्याचे तपास यंत्रणेला दिसून आले होते. त्यांनी शिवाजीनगर परिसरातील व्यक्तीला नोटीस बजावली होती. तसेच राजस्थानला फरार झालेल्या आरोपीचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.
तपास यंत्रणांनी संबंधितांना परस्पर नोटीस बजावली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आम्हीदेखील या प्रकरणाचा छडा लावत आहोत. हवालाचा व्यवहार हा शेकडो कोटींमध्ये असू शकतो, असे सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणाचा खोलवर तपास करण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.