नामसाध्यर्म्य उमेदवार उभे करण्यात रायगड अग्रेसर

| रायगड | प्रतिनिधी |

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुख्य उमेदवारांसमोर नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे करण्याचा प्रयोग रायगडच्या राजकारणात सातत्याने केला जात असून या निवडणुकीतही असा प्रयोग पुन्हा केला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत विकासाचे ठोस मुद्दे, जाहिरनामे यांचा फारसा विचार न करता नामसाधर्म्यातून समोरच्या उमेदवाराची मते कशी विभागली जातील, याकडे लक्ष दिले जात असल्याने जिल्ह्यातील या अपयशी ठरलेल्या नामसाधर्म्याला आता मतदारही कंटाळल्याचे दिसत आहेत.

कुलाबा मतदारसंघाचे विभाजन होऊन मावळ व रायगड हे लोकसभेचे दोन मतदारसंघ तयार झाले. कुलाबा मतदारसंघात शेकाप आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू असे. बॅ. अंतुले आणि शेकापचे दत्ता पाटील यांच्यात राजकिय चुरस सातत्याने निर्माण होत असे. कुलाबा मतदारसंघात नामसाध्यर्म्य असलेले उमेदवार उभे करून मतांचे विभाजन करण्याच्या खेळी काँग्रेस व शेकापने सातत्याने केल्या आहेत. मतदारसंघ बदलले, मतदार बदलत आहेत, प्रचाराचा पद्धती बदलत आहेत. तरीही निष्प्रभ ठरलेल्या नामसाध्यर्म्याच्या खेळी आजही राजकारणात दिसत आहेत. त्यामुळे प्रचाराचे ठोस मुद्दे, विकासात्मक बाबींवर निवडणूक लढण्याची ताकद राजकिय पक्षांत नसावी का? हा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. नामसाध्यर्म्य असलेले उमेदवार उभे केल्याने कोणत्याही विजयी व मुख्य उमेदवाराला याकामी फटका बसलेला दिसत नाही. कुलाबा मतदारसंघात यापूर्वी 1991 साली बॅ. अंतुले यांच्या विरोधात शेकापचे दत्ता पाटील उभे होते. त्यावेळी व त्यानंतर 1996 सालीही दत्ता पाटील नावाचा नामसाधर्म्य असलेला उमेदवार रिंगणात उभा करण्यात आला होता. 1998 साली शेकापचे रामशेठ ठाकूर यांच्या विरोधात अन्य राम ठाकूर उभे केले गेले. वारंवार लोकसभा निवडणूक लढविणार्‍या शेकापने 2004 साली बॅ.ए.आर. अंतुले यांच्या विरोधात ए.आर. अंतुले नावाचा उमेदवार उभा केला होता. मागील लोकसभा निवडणुकीतही मावळमधून लक्ष्मण जगताप, श्रीरंग बारणे; तर रायगडमध्ये सुनील श्याम तटकरे असे नामसाध्यर्म्य असलेले उमेदवार रिंगणात उभे केले होते.

नामसाधर्म्याची खेळी फोल
2014 च्या लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात सुनील तटकरे याच्या विरोधात सुनील श्याम तटकरे नावाचा उमेदवार रिंगणात होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते, काँग्रेस आघाडीचे सुनील तटकरे निवडणूक लढवत होते. अनंत गीते यांचे नामसाध्यर्म्य असलेल्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला; परंतु सुनील तटकरे यांचे नामसाधर्म्य असलेले सुनील पांडुरंग तटकरे व सुनील सखाराम तटकरे असे दोघे मात्र रिंगणात कायम राहिले. त्यावेळी नामसाधर्म्याची खेळी चालली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे सुनील तटकरे 31 हजार मतांनी विजयी झाले.
अनंत गीतेंच्या विरोधात तीन गीते
इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार अनंत गंगाराम गीते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच वेळेस नावात साधर्म्य असलेल्या तीन अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. 2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरेंच्या विरोधात सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. या दोघांनी अनुक्रमे 9752 आणि 4126 मते मिळवली होती, याचा फटका राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रय तटकरे यांना बसला होता. हिच रणनिती आता महायुतीकडून अनंत गीते यांच्या विरोधात वापरली जात आहे.
Exit mobile version