हातभट्टी चालविणे पडले महागात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अवैधरित्या गावठी हातभट्टीचा धंदा चालविणे महागात पडले आहे. रोहामधील चौघांविरोधात कारवाई करीत रायगड पोलिसांनी दणका दिला आहे. एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिले. या कारवाईने जिल्ह्यातील अन्य अवैध धंदेवाल्यांवर वचक बसली आहे.
काशीनाथ ढेबे, योगेश झोरे, मिलींद झोरे, बाळाराम होगाडे असे या दारु माफियांची नावे आहेत. हे चोघेजण रोहा तालुक्यातील टिटवी येथील रहिवासी आहेत. हे चौघेजण गेल्या 2029 पासून बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारु तयार करणे. त्या दारुची अनाधिकृतपणे विक्री करून कुटूंब उध्वस्त करण्याचा प्रकार करीत होते. या चौघांना वेळोवेळी रोहा पोलिसांनी समज दिली. गुन्हे दाखल करून प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील पोलिसांच्या कारवाईला न जुमानता गावठी हातभट्टी दारु तयार करण्यापासून ती विक्रीचा धंदा चालवित होते. या अवैध दारु विक्रीच्या व्यवसायामुळे रोहा आणि मुरूड तालुक्यासह आजूबाजूच्या गावांतील मंडळी तरुण पिढी व्यसनाधीन होण्याची भिती निर्माण झाली हती. समाजात वाद विवाद होण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला होता. या गैरप्रकाराला रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी पाऊल उचलले. सामान्य जनतेचे जनजीवन सुरळीत व्हावे, दारुच्या आहारी जाऊन तरुण पिढी बिघडू नये, तसेच कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या चौघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. या कारवाईने बेकायदेशीर दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका मिळाला असून जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे,गुंगीकारक पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेले, अवैध मटका, जुगार धंदे चालविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होऊनदेखील त्यांच्या वागणुकीत बदल दिसून आला नाहीत. तर त्यांनाही हद्दपार केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
