सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड पोलीस अव्वल

राज्यातून तिसर्‍या क्रमांकाचे यश

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात सीसीटीएनएस कार्यप्रणाली प्रभावी ठरत आहे. या कार्यप्रणालीचा वापर करीत वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल केली आहे. वार्षिक गुणांकनामध्ये रायगड पोलीसांनी राज्यातून तिसरा क्रमांक मिळविण्यास यश संपादन केले आहे. पोलिस महासंचालक रश्मी शुल्का यांच्या हस्ते वार्षिक गुणांकनाचे पारितोषिक देण्यात आले. पुणे येथील रामटेकडी येथे झालेल्या 18 व्या महाराष्ट्र पोलिस कर्तव्य मेळाव्यात हा सोहळा पार पडला.

आधुनिकेतचा वापर करीत रायगड पोलिसांकडून वेगवेगळ्या गुन्हयांची उकल करण्यात आली आहे.सीसीटीएनस म्हणजे क्राईम अ‍ॅन्ड क्रिमिनल टॅ्रकींग नेटवक्स अ‍ॅन्ड सिस्टीम हा भारत सरकारच्या अंतर्गत येणारी ऑनलाईन ट्रॅकींग प्रणाली आहे. मुंबईमधील 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर ही संकल्पना मांडण्यात आली. या प्रणालीद्वारे सर्व पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची नोंदणी, तपास, आरोपपत्राशी संबंधित माहिती डिजीटल करणे, गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची माहिती घेणे, अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध लावण्यास उपयोगी ठरत आहे. रायगड पोलिसांनी या प्रणालीद्वारे पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांवर तात्काळ अहवालांची नोंदणी करण्यावर भर दिला. या प्रणालीद्वारे गुन्ह्यांवर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न कायमच केला आहे. रायगड पोलिसांनी गुणांकनात राज्यात तिसरा क्रमांक मिळवून पुन्हा एकदा आपली सरशी सिध्द केली आहे. यापुर्वीदेखील सीसीटीएनएस कार्यप्रणालीच्या वार्षिक गुणांकनात यश संपादन केले आहे. राज्याच्य महापोलीस संचालक रश्मी शुल्का यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हे पदक मिळविले आहे. त्यामुळे रायगड पोलिसांची मान उंचावली आहे.

पोलीस ठाण्यात अटक होणार्‍या गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात सीसीटीएनएस ही प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत आहे. रायगड जिल्हा पोलीस दलाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरू राहील, असे मत अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी व्यक्त केले आहे.

रायगड पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या अपार मेहनतीमुळे सीसीटीएनएस कार्यप्रणालीत पुन्हा यश मिळवता आले आहे. या यशाचे सातत्य कायम ठेवत यापुढेही रायगड जिल्हा अग्रस्थानी ठेवण्याकरीता प्रयत्नशील राहील.

– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

Exit mobile version