| रायगड । प्रतिनिधी ।
पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी येत्या दि.12 मे ते 7 जून 2025 या कालावधीत जिल्ह्यात क्षेत्रीय तपासणी संच (एफ.टी.के.) द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व 1831 गावामध्ये ही मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छ, शुद्ध गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलबध करून देण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली.
पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीमेतंर्गत रासायनिक व जैविक क्षेत्रीय तपासणी (एफ.टी.के.) संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.या मोहिमेतंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवता विषयक एफ.टी.के.प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना एफ.टी.के.किटव्दारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे, 8 ते 10 मधील विद्यार्थ्यांमार्फत शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्यामधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्यूक्यूएमआयएस पोर्टलवर नोंदी घेणे, नळ पाणी पुरवठा योजना स्त्रोत, घरगुती नळ जोडण्या, शाळा, अंगणवाड्यांची पाणी गुणवता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफ.टी.के.संचाचे वाटप करणे, स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार आहेत.
काय आहे क्षेत्रीय तपासणी संच
एफ.टी.के.म्हणजे क्षेत्रीय पाणी तपासणी संच आहे. जे प्राथमिक स्वरूपात पिण्याच्या पाण्यातील रासायनिक आणि जैविक घटकांची तपासणी करण्यासाठी वापरले जाते.यामुळे पाण्याची गुणवत्ता त्वरित ठरवणे, गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखण्यास मदत करणे हा या संचाचा उदेश्य आहे.यामध्ये पीएच स्तर, क्लोरीन, नायट्रेट, क्लोराइड,क्लोराईड, लोह,अल्कलिनिटी,गढूळपणा, हार्डनेस,कॅल्शिअम, मॅग्नेशिअम तसेच जैविक प्रदूषणबाबत तपासणी केली जाते.याचा प्राथमिक स्तरावर लगेच निकाल मिळतो.या संचाद्वारे पाणी पुरवठा स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व घरगुती नळ जोडण्याची पाणी गुणवत्ता तपासली जाणार आहे.
एफ.टी.के.संचाद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीमेमध्ये विविध विभागांचा सहभाग राहील. त्यामध्ये ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभागाचा सहभाग राहिल. सर्वांच्या मदतीने व्यापक जनजागृती मोहीम यशस्वी केली जाणार आहे. नागरिकांनी या कामी प्रशासनास सहकार्य करावे.
नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद