Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

ठेकेदाराच्या मनमानीकारभाराचा फटका

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

प्रति माणसी 55 लिटर पाणी देण्याच्या दिखावा करीत केंद्र पुरस्कृत जलजीवन योजना वळवलीमध्ये राबविण्यात आली. मात्र तीन वर्षे होत आली, तरीही अजूनही योजनेचे काम पुर्ण झाले नाही.निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबरोबरच पाईप उघड्यावर टाकण्यात आले आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका वळवली गावांतील नागरिकांना बसत आहे. बेलोशीचे माजी सरपंच राजेंद्र चवरकर यांनी अखेर पाण्यासाठी जिल्हा परिषदेसह ग्राम विकास विभागाकडे धाव घेतली असून या कामाविरोधात लेखी तक्रार केली आहे.

अलिबाग तालुक्यातील बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील वळवली या गावाची लोकसंख्या साधारणपणे एक हजार दोनशे आहे. या गावांतील नागरिकांना उमटे धरणातील पाण्यावर अवलंबून राहवे लागत आहे. या गावामध्ये 2003 मध्ये पाणी पुरवठा योजना सुरु झाली. गेल्या 23 वर्षात या योजनेचे पाईप जीर्ण झाले आहेत.
ठिकठिकाणी पाईप फुटले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्ती केली जात नसल्याने वळवली गावातील महिला मंडळ वर्गणी काढून फुटलेल्या पाईपची दुरुस्ती करतात. वळवली गावामध्ये 2023-2024 मध्ये जलजीवन अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. गावातील तलावात 15 फुट खोलीचा खड्डा करून विहीर बांधण्यात आली. विहीरीच्या बाजूला पंपासाठी केबीन बांधण्यात आली. घराघरात नळ कनेक्शन मिळणार या आशेवर येथील महिला आनंदी होत्या. डोक्यावरील हंडा उतरण्याची अपेक्षी होती. परंतू ठेकेदाराने घोर निराशा केल्याचा आरोप माजी सरपंच राजेंद्र चवरकर यांनी केला आहे. पंपासाठी बांधण्यात आलेल्या केबीनचा स्लॅब कोसळला आहे. कोणत्याही प्रकारचे खोदकाम न करता, पाईप जमीनीवर टाकण्यात आले आहेत. तळ्यामध्ये विहीर बांधताना संरक्षण भिंत तोडण्यात आली आहे. तोडलेली संरक्षण भिंत अद्याप नव्याने बांधण्यात आली नाही. या योजनेसाठी 97 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अद्यापर्यंत ही योजना पुर्ण झाली नाही. मागील तीन वर्षात पाण्याचा थेंंबही घरात पोहचला नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊनही या योजनेचे काम आजही अपूर्ण स्थितीत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबरोबरच पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे वळवली गावांतील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अखेर राजेंद्र चवरकर यांनी ग्राम विकास विभागासह जिल्हा परिषद अध्यक्षांकडे या प्रकाराबाबत लेखी तक्रार केली आहे. संबंधितांविरोधात कारवाई करण्यात यावी. तसेच ही योजना पूर्ण करून गावांतील नागरिकांना पाणी मिळावे,अशी मागणी करण्यात येत आहे.

सीएसआरमधील टाकी कोरडीच
अलिबाग तालुक्यातील वळवली येथील गावांतील नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी आदिवासीवाडी जवळ एक मोठी साठवण टाकी सीएसआर फंडातून बांधण्यात आली आहे. उसर येथील गेल कंपनीच्या मार्फत ही टाकी बांधण्यात आल्याची माहिती श्रीकांत भगत यांनी दिली आहे. या टाकीच्या बांधकामासाठी 58 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, आजही ही टाकी कोरडीच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.लाखो रुपये खर्च करूनही योजनेचा लाभ जनतेला मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
Exit mobile version