पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना; 1 लाख 16 हजार 100 ग्राहकांचे उद्दिष्ट
। रायगड । सुयोग आंग्रे ।
केंद्र सरकारने ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना’ सुरू केली आहे. त्यात तीन किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेतील ग्राहकाच्या प्रकल्पातून गरजेहून जास्त वीज तयार झाल्यास त्यांना मोफत वीज मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण मंडळांतर्गत 1 लाख 16 हजार 100 घरगुती ग्राहकांना पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून सौर पॅनल बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील दोन गावांची सौर गावे म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाड तालुक्यातील पाडावीपठारआणि खालापूर तालुक्यातील वडवळ गावांचा समावेश आहे.
घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. त्यात गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीज बिल शून्य येते. सोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळणे शक्य आहे. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्याच्या 19 फेब्रुवारीच्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणार्या वीज ग्राहकांना दोन किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॉटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर सब डिव्हिजनच्या अंतर्गत असणार्या वरंध सेक्शनमधील पाडावी पठार या गावामधील66 घरांना पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना पुरवण्यात येणार आहे. या गावात 64 घरे, पथदिवे आणि पाण्याच्या पंपासाठी वीज मिळावी म्हणून सौर पॅनल बसविण्यात येणार आहेत. खालापूर सब डिव्हिजनच्या अंतर्गत असणार्या वावोशी सेक्शनमधील 281 घरांवर सौर पॅनल बसविण्यात येणार आहेत. यामध्ये 261 घरे, 8 व्यापारी गाळे, 2 औद्योगिक वापर , पथदिवे 4, सार्वजनिक ठिकाणे 2, पाणी योजनेच्या विजेसाठी 4 ठिकाणी सौर पॅनल बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 1337 वीज ग्राहकांनी ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने’साठी प्रस्ताव सादर केले होते. यापैकी 227 ग्राहकांच्या घरांवर सौर पॅनल बसविण्यात आले आहेत. 956 ग्राहकांनी वेंडर, एजन्सीची निवड केली नसल्याने त्यांचे काम प्रलंबित असल्याचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी सांगितले.
दोन किलोवॉटहून अधिक एक किलोवॉट म्हणजे तीन किलोवॉटचे सिस्टिम बसविणार्या ग्राहकाला एका किलोवॉटला अठरा हजार रुपये अधिकचे अनुदान मिळेल. अर्थात एक किलोवॉटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॉटसाठी 78 हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट ग्राहकाला मिळेल. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रति ग्राहक 78 हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे. 13 फेब्रुवारीनंतर रूफ टॉप सोलरसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळेल. राज्यातील वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल अॅपही यासाठी उपलब्ध आहे.
किती वीज तयार होते
एक किलोवॉट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणार्या कुटुंबाला दोन किलोवॉट क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणार्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॉट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते. केंद्र सरकारकडून मिळणार्या अनुदानाच्या आधारे वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवण्यासाठी महावितरणने यापूर्वीच यशस्वी प्रयत्न केले आहेत.