शाळेच्या गेटवर पालकांचे व बदलापूरकरांचे ठिय्या आंदोलन
। बदलापूर । प्रतिनिधी ।
महिलांवरील अत्याचाराचे सत्र चालूच असताना अशीच एक संतापजनक घटना बदलापूरमध्ये घडाली आहे. बदलापूरमधील नामांकित शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. तसेच, पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
बदलापुरातील आदर्श विद्यालय या शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडितेपैकी एका लहान मुलीने आपल्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचे सांगितले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही असाच धक्कादायक प्रकार घडला.
याप्रकरणानतंर पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. या पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. या घटनेविरुद्ध संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने मंगळवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून पालक आणि नागरिक शाळेबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिला. आरोपीला कठोर शिक्षा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आली. तसेच, याप्रकरणी आज बदलापूरकरांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला व्यापारी संघटना, स्कूलबस संघटना आणि रिक्षा संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबीत करण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणी शाळेने माफीनामा दिला आहे.