। पाली । वार्ताहर ।
उन्हाची काहिली वाढत आहे. त्यामुळे शरीराला थंडावा देणार्या कलिंगड, लिंबू, उस आणि काकडीला मागणी वाढत आहे. परंतु, अवकाळी पावसामुळे याचे उत्पादन घटले असून दर्जाही खालावला आहे. त्यामुळे या फळांचे भाव वाढल्याने सर्वांना घाम फुटला आहे. तसेच, जिल्ह्यातील स्थानिक कलिंगडाचा गोडवा सुद्धा कमी झाला आहे.
निसर्गाची देण असलेले कलिंगड, लिंबु सरबत, उसाचा रस आणि काकडी हे उष्मा घालविण्यासाठी सर्वात सोपा व स्वस्त पर्याय आहे. परंतु जिल्ह्यासह राज्यात पडलेला अवकाळी पाऊस यामुळे कलिंगड, लिंबू आणि काकडीचे नुकसान झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 ते 25 टक्यांनी भाव वाढले आहेत. अवकाळी पावसाने रायगडच्या कलिंगडाची गोडी उडाली आहे. त्यामुळे नाशिक व इतर ठिकाणावरील कलिंगड जिल्ह्यात विक्रीसाठी येत आहेत. लिंबाचीही आवक घटली आहे. त्यामुळे त्यांचेही भाव वधारले आहेत. लिंबाला तर संत्री आणि मोसंबी इतका भाव आहे. त्यामुळे लिंबू सरबतही महागले आहे. कोकम व काकडीचे भावही वधारले आहेत. मागील वर्षी पेक्षा यावर्षी कलिंगडामध्ये 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तर एका मोठ्या काकडीमागे पाच ते 10 रुपयांनी वाढ झाली आहे. उसाचे दरही शेकड्यामागे 100 रुपयांनी वाढले आहेत. परिणामी उष्म्यापासुन बचाव करण्यासाठी आता नैसर्गिक पर्याय सोडुन कृत्रिम पर्याय निवडत आहेत.
पावासाने या वर्षी जिल्ह्यातील कलिंगडाची गोडी हरवली आहे. उत्पादन घटले असून कलिंगडाचा आकारही प्रमाणात नाही. बहुतेक माल खराब निघत आहे. योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे नुकसान होत आहे. परिणामी नाशिक येथून सुगरकेन जातीचे कलिंगड विक्रीसाठी आणावे लागत आहेत.
उमेश मढवी,
कलिंगड विक्रेता, पाली
उन्हाळ्यात लिंबाची मागणी वाढली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात लिंबाचे भाव वाढले आहेत. परिणामी किरकोळ बाजारातही लिंबाचे भाव प्रचंड वाढले आहेत. मात्र, ग्राहक कमी किंमतीत मागणी करतात हे परवडत नाही.
कल्पेश थळे,
भाजी विक्रेता
1) मोठा लिंबू- 7 ते 8 रुपयाला 1 (मागील वर्षी 5 रुपयाला 1) 2) छोटा लिंबू- 10 रूपयाला 2 (मागील वर्षी 10 रुपयाला 3) 3) मोठा कलिंगड- 90 ते 110 रुपये 2 ते 3 किलो (मागील वर्षी 50 ते 70 रुपये) 4) मोठी काकडी- 25 रुपये (मागील वर्षी 15 ते 20 रुपये) 5) उसाचा रस- हाफ 15 रुपये, फुल 20 रुपये (मागील वर्षी हाफ 10 व फुल 15 रुपये) 6) कोकम- 100 ते 120 रुपये किलो (मागील वर्षी 80 रुपये किलो)