। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पुणे येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत पहिल्या साखळी सामन्यात रायगडने हिंगोलीवर एक डाव व 142 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात निर्णायक विजय मिळवून रायगडने पुर्ण गुण वसूल केले.
हिंगोली संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु रायगड संघाने हिंगोली संघाचा डाव 157 धावात 44.2 षटकांमध्ये गुंडाळला. रायगडने आपला पहिला डाव 73 षटकांत 8 बाद 424 या धावसंख्येवर घोषित केला.पहिल्या डावात 267 धावांची भक्कम आघाडी घेऊन रायगडने हिंगोली संघाचा दुसरा डाव 125 धावात गुंडाळला. हिंगोलीच्या पहिल्या डावात निलय सावंत या फिरकी गोलंदाजाने भेदक गोलंदाजी करून 4.2 षटकात 13 धावा देत, हॅट्रिकसह 4 बळी घेतले. राहुल सिंग या फिरकी गोलंदाजाने 12 षटकात 30 धावांत 3 बळी घेतले.
रायगडच्या पहिल्या डावात क्रिश पाटील व नैतिक सोळंकी याने शतक केले. क्रिश पाटीलने 98 चेंडूंचा सामना करून 19 चौकार व 2 षटकारांसह 132 धावा केल्या. नैतिक सोळंकी याने 118 चेंडूना सामोरे जात 23 चौकार व 1 षटकारासह नाबाद 124 धावा केल्या. अमेय पाटील (57 धावा ) व स्मित पाटील (33 धावा) यांनी देखील चांगली फलंदाजी केली. राहुल सिंग (3 बळी) व ओम म्हात्रे (3 बळी) यांनी भेदक गोलंदाजी करून हिंगोली संघाचा दुसरा डाव 38.2 षटकात 125 धावात संपवला. या सामन्यात दोन्ही डावात मिळून राहुल सिंगने 6 बळी घेतले.