19 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड; जलदगती गोलंदाज आणि धडाकेबाज फलंदाज
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची अष्टपैलू खेळाडू रोशनी रवींद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील मुलींच्या टी-20 क्रिकेट संघात निवड झाली आहे. यापूर्वीही रोशनीची महाराष्ट्राच्या 15, 19 व 23 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघासह महिलांच्या वरिष्ठ गटात निवड झाली आहे.
अष्टपैलू खेळाडू असलेल्या रोशनीने गतवर्षी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघातून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. ती जलदगती गोलंदाज तसेच धडाकेबाज फलंदाज असून, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाकडून सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. एसबीसी महाड क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक आवेश चिचकर व अध्यक्ष बशीर चिचकर यांनी रोशनीच्या खेळातील प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनातून रोशनीने केलेल्या मेहनतीचे फलित म्हणून तिची महाराष्ट्राच्या मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. रोशनीचे वडील रविंद्र पारधी, एसबीसी क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष बशीर चिचकर व मुख्य प्रशिक्षक आवेश चिचकर यांच्याशी संवाद साधला असता, रोशनीने क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत व केलेल्या अथक परिश्रमाचे चीज झाले असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात तिची महाराष्ट्राच्या महिला वरिष्ठ संघात आणि त्यानंतर भारतीय संघात निवड व्हावी, हीच आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी रोशनी व तिच्या पालकांचे तसेच प्रशिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले. रायगडच्या खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणे आवश्यक असून, रोशनीला भविष्यात लागणारी सर्वतोपरी मदत आरडीसीएतर्फे करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आरडीसीएचे सर्व पदाधिकारी, सदस्य व क्रिकेटप्रेमींनी रोशनीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







