| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तब्बल 9 कोटी 30 लाख रुपयांचा संभाव्य कृती आराखडा तयार केला असला, तरी अनेक गावांमध्ये आजही महिलांच्या डोक्यावर पाण्याचे हंडे दिसत आहेत. जिल्ह्यात यंदा तीन हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस होऊनही जानेवारीनंतर पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, नवीन विंधन विहिरी घेणे तसेच नळ पाणी योजनांची विशेष दुरुस्ती अशा उपाययोजनांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने आराखडा मोठा पण पाणी कुठेय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस पडला. तीन हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला. धरणे, नदी, तलाव पाण्याने तुडूंब भरले. जिल्हा परिषदेसह वेगवेगळ्या विभागामार्फत जलजीवन योजनांसह अन्य पाण्याच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र तरीदेखील पाण्याची टंचाई जानेवारीनंतर निर्माण होते. पाण्यासाठी अनेक गावांतील नागरिकांना वणवण करावी लागतेे. म्हणूनच पाण्याचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई संभाव्य आराखडा तयार केला आहे. ऑक्टोबर 2025 ते जून 2026 या कालावधीसाठी नऊ कोटी 30 लाख 50 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील 467 गावे व 786 वाडया असे एकूण एक हजार 253 ठिकाणी हा निधी खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कृती आराखडा निरंक आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत 4 कोटी नऊ लाख 58 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यात 306 गावे व वाड्यांचा समावेश आहे. एप्रिल ते जून या कालावधीत 947 गावे व वाड्यांसाठी पाच कोटी, 20 लाख, 92 हजार रुपयांचा अपेक्षीत खर्च आहे.
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. धरणांसह अन्य पाण्यांच्या स्त्रोतांमधील पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. जिल्ह्यामध्ये नऊ कोटी 30 लाख रुपयांचा पाणी टंचाई संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यापासून सार्वजनिक विहीरी खोल करणे, गाळ काढणे, नवीन विंधन विहीरी घेणे तसेच विशेष दुरुस्ती करणे अशा अनेक प्रकारची कामे केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विशेष दुरुस्तीसाठी दोन कोटी
जिल्ह्यात ठिकठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक योजना होऊनही पाणी नाही, पाईप नादूस्त आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यावर्षी पाणी टंचाई कृती आराखड्यामध्ये नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती करण्यासाठी 2 कोटी 74 लाख 84 हजार रुपयांचा अपेक्षीत खर्च आहे. त्यामध्ये 85 गावे व 15 वाड्या अशा एकूण शंभर ठिकाणी हा निधी खर्च केला जाणार आहे.
पाणी टंचाई आराखड्यावर दृष्टीक्षेप
योजना - एकूण गावे - वाड्या - अपेक्षीत खर्च (रुपयात)
टँकरने पाणी पुरवठा करणे - 774 - तीन कोटी 49 लाख
सार्वजनिक विहीरी खोल करणे, गाळ काढणे - 174 - एक कोटी 72 लाख
नवीन विंधन विहीरी बांधणे - 102- 94 लाख 25 हजार
नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती करणे - 100 - दोन कोटी 74 लाख
एक दिवसआड पाणी
अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरणात पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. मे महिन्यात पाण्याचा दुष्काळ निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने उमटे धरणातून नियमीत होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात सुरु केली आहे. मागील आठ दिवसांपासून एक दिवस आड पाणी देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे या गावांतील सुडकोलीपासून आक्षीपर्यंतच्या 12 ग्रामपंचायतीच्या 60 हजार नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
