जिल्ह्यातील नागरिक सुखावले
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दिर्घ प्रतिक्षेनंतर रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत सोमवारी (दि.19) पाऊस कोसळला. जिल्ह्यातील दक्षिण रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. गेली अनेक दिवस उष्णतेने त्रस्त झालेले नागरिक हवेत गारवा निर्माण झाल्याने सुखावून गेले आहेत.
सप्टेंबरपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारली होती. पावसाअभावी भात पिके पिवळी पडली होती. भात पिकांवर करपासह अन्य पिकांचा रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. पाऊस नसल्याने धरणांसह नदी, तलावांमधील पाणी पातळीही कमी होण्याची भिती निर्माण झाली होती. पाणी टंचाईचे संकट ओढावले होते. त्यामध्ये उन्हाचे चटके नकोसे झाले होते. ऑक्टोबर हीट सुरुवातीपासूनच जाणवू लागली होती. सकाळी 10 वाजल्यापासून कडक ऊन जाणवत असल्यामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले होते. कधी पाऊस पडणार याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर सोमवारी दुपारनंतर दक्षिण रायगडमध्ये विशेषतः महाड व परीसरात ढगांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने या भागातील नागरिक सुखावून गेले आहेत. हवेत गारवा निर्माण झाल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.
