राष्ट्रीय महामार्गवर तळे

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावरील कळंब गावाजवळील रस्त्यावर तळे निर्माण झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे मोठ्या आकाराचे असून त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून तळे साचले आहे. या तळ्यातून आम्ही मार्ग कसा काढायचा, असा प्रश्‍न साळोख गावाचे माजी उपसरपंच असीम बुबेरे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्ग दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या महामार्गावरील बहुसंख्य रस्ता हा काँक्रीटचा बनला आहे. मात्र, कर्जत तालुक्यातील कळंब येथील काही भाग हा डांबरी रस्त्याचा आहे आणि त्याच भागातील रस्ता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कर्जत-मुरबाड रस्त्यावरील कळंब येथील पोलीस चौकीच्या पुढे असलेल्या भागातील रस्ता सुरवातीच्या पावसाळ्यातच वाहून गेला आहे. त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. यातून वाहने काढायची कशी, असा प्रश्‍न वाहनचालकांना पडला आहे. दरम्यान, या भागातील रस्ता हा वळणदार असून या रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी रस्त्याचे वळण कमी करण्यासाठी एक पूल बांधला आहे. मात्र, त्या पुलाचे बांधकाम होऊन दोन वर्षे झाली असून त्या नवीन पुलावरून वाहतूक कधी सुरु होणार, असा प्रश्‍न स्थानिक वाहनचालक करीत आहे.

Exit mobile version