। रायगड । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली आहे. आत्तापर्यंत सरासरी 3 हजार 295 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत 106 टक्के आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला होता. मात्र जुलै महिन्यात पावसाने कसर भरून काढली. ऑगस्ट महिन्यातही समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे पावसाने तीन महिन्यातच वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी गाठली आहे. सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसात मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 3 हजार 101 मिलीमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत ऑगस्ट अखेरपर्यंत सरासरी 3 हजार 295 झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत 300 मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग 2 हजार 769 मिमी, मुरुड 2 हजार 585 मिमी, पेण 3 हजार 174 मिमी, पनवेल 3 हजार 039 मिमी, उरण 2 हजार 444 मिमी, कर्जत 3 हजार 684 मिमी, खालापूर 3 हजार 522 मिमी, सुधागड 3 हजार 658 मिमी, रोहा 3 हजार 246 मिमी, माणगाव 2 हजार 781 मिमी, तळा 3 हजार 708 मिमी, महाड 3 हजार 340 मिमी, पोलादपूर 3 हजार 748 मिमी, म्हसळा 3 हजार 423 मिमी, श्रीवर्धन 2 हजार 644 मिमी, माथेरान 4 हजार 967 मिमी पावसाची नोंद झाली आहे.