गुवाहाटीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस; मुंबईचा 26 धावांनी पराभव
| गुवाहाटी | वृत्तसंस्था |
राजस्थान रॉयल्सने आयपीएलमधील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. गुवाहाटीच्या खेळपट्टीवर मंगळवारी (दि.7) राजस्थानचा सामना मुंबई इंडियन्स सोबत झाला. पावसामुळे हा सामना 11-11 षटकांचा खेळविण्यात आला. मात्र, राजस्थानने मुंबई समोर तब्बल 151 धावांचे लक्ष ठेवले होते. परंतु, मुंबई संघाच्या सुमार कामगिरीमुळे राजस्थानने विजयाची हॅटट्रिक साजरी केली.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सचे सलामिवीर यशस्वी जैसवाल आणि वैभव सुर्यवंशीने पहिल्या चेंडूपासूनच बॅट फिरकवायला सुरूवात केली. यशस्वीने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सच्या दीपक चहरला फैलावर घेताना 22 धावा कुटल्या. त्यानंतर वैभवने जसप्रीतचा पहिलाच चेंडू 88 मीटर लांब भिरकावला. वैभव व यशस्वी जोडीने 5 षटकांत 80 धावा जोडल्या. वैभव 14 चेंडूत 1 चौकार व 5 षटकारांसह 39 धावांवर झेलबाद झाला. ध्रुव जुरेल (2) आणि रियान पराग (20) यांना अल्ला घझनफरने बाद केले. यशस्वी जैस्वालनने 32 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 77 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे राजस्थानने 11 षटकांत 3 बाद 150 धावांचा डोंगर उभा केला.
त्यानंतर धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या रायन रिकेल्टने षटकार मारून आक्रमकता दाखवली, परंतु जोफ्रा आर्चरने टाकलेल्या चेंडूने रिकेल्टनचा अवघ्या 8 धावांवर जागच्या जागी उत्तुंग झेल उडाला. सूर्यकुमार यादवही 6 धावांवर नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही पायचीत झाला आणि मुंबईने 22 धावांत 3 फलंदाज गमावले. हार्दिक पांड्या (9) व तिलक वर्मा (14) यांच्याकडून खूप अपेक्षा असतानाही दोघेही एकाच षटकात माघारी परतले. यावेळी मुंबईला 50 धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी 6 षटके लागली. शेरफान रदरफर्ड आणि नमन धीर यांनी चांगली फटकेबाजी करून सामन्यात चुरस निर्माण केली होती. परंतु, या दोघांची 17 चेंडूंत 47 धावांची भागीदारी तुषार देशपांडेने तोडली. रदरफर्ड 8 चेंडूंत 25 धावांवर बाद झाला. नमनही 13 चेंडूंत 25 धावांवर बाद झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. यावेळी मुंबईला 11 षटाकांत 9 बाद 123 धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानने हा सामना 26 धावांनी जिंकला.गुवाहाटीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस
वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने मुंबई विरूद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने 11-11 षटकांच्या सामन्यात 14 चेंडूत 39 धावांची वादळी खेळी केली. त्यात 1 चौकार व 5 खणखणीत षटकारांचा समावेश होता. तसेच, जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहला पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. त्याचबरोबर गेल्या आठ वर्षांपासून रिषभ पंत व इशान किशन यांच्या नावावर असलेला विक्रम वैभवने मोडला. या युवा खेळाडूने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्तंय एकूण 35 षटकार मारले आहेत आणि लीगच्या इतिहासातील कोणत्याही किशोरवयीन खेळाडूने मारलेले हे सर्वोत्तम षटकार ठरले आहेत. तसेच, राजस्थानच्या या प्रतिभावान खेळाडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 374 धावा केल्या आहेत. तसेच, लीगमध्ये 18 वर्षांखालील खेळाडूंमध्ये सर्वोत्तम धावा करणाऱ्यांमध्ये वैभव अव्वल आहे.
