कॅरम स्पर्धेत राजेश गोहिल प्रथम

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली येथे नुकत्यातच रायगड जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा येथील भक्तनिवासाच्या दोन हॉलमध्ये पार पडली. यावेळी जिल्ह्यातील तब्बल 64 कॅरमपटूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत राजेश गोहिल यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर, पनवेलच्या अश्रफ खान यांनी द्वितीय आणि कामोठे येथील वैभव शिंदे यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.

रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व अनुपम कुलकर्णी यांच्या सौजन्याने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष व कमळ नागरी पतसंस्थेचे संस्थापक गिरीश तुळपुळे, अनुपम कुलकर्णी, अभिजीत तुळपुळे व अभिजीत कॅरम क्लबचे वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. यावेळी सुरको कॅरम कंपनीचे तब्बल 12 कॅरम बोर्ड स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. या स्पर्धेत कामोठे येथील राजेश गोहिल यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानांकन पटकावले. तर, पनवेलच्या अश्रफ खान यांनी द्वितीय आणि कामोठे येथील वैभव शिंदे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे पुरुष एकेरी गटातील विजेत्यासाठी अनुपम कुलकर्णी यांच्यावतीने 10 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व चषक देण्यात आले. तसेच, स्पर्धेतील पहिल्या 16 क्रमांकाच्या खेळाडूंना देखील पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन अभिजीत तुळपुळे व अभिजीत कॅरम क्लबच्या खेळाडूंनी केले. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर यांनी दोन दिवस पंच म्हणून जबाबदारी सांभाळली, तर राज्यस्तरीय पंच देविदास सिनलकर यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा नियोजित वेळेत सुरू होऊन नियोजित वेळेतच पार पडली.

Exit mobile version