घराघरात राजमाता जिजाऊ तयार होण्याची गरज: विकास चित्ते

| नेरळ | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले स्वराज्य पुन्हा एकदा अवतरले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाच्या घरात राजमाता जिजाऊ यांनी जन्म घ्यायला हवा, असे उद्गार हायकर्स आणि ट्रेकर्स यांचे मार्गदर्शक गिर्यारोहक विकास चित्ते यांनी काढले. कर्जत तालुक्याचे शासकीय तंत्र शिक्षण संस्था असलेल्या बामणोली येथील श्री वामनराव पै शासकीय औद्योगिक संस्थेत राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

सदगुरु वामनराव पै शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे राष्ट्रीय युवा दिन निमित्त कार्यक्रमाक्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशंभो युवा हायकर्स संस्थेचे अध्यक्ष, गिर्यारोहक विकास चित्ते, प्राचार्य जी.बी. चौधरी तसेच गट निदेशक चौधरी तसेच संस्थेमधील शिक्षक आदी उपस्थित होते. विकास चित्ते यांनी आपल्या व्याख्यानात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे जिवनावरील विचार मांडले. श्री छत्रपती शिवाजी महाराज घराघरात जन्माला यायचे असेल तर प्रथम घराघरात आऊसाहेब तयार होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. जिजाऊ आऊसाहेब यांनी केलेले संस्कार, शिकवलेले युद्ध कौशल्य व स्वराज्य स्थापनेचे स्वप्न याबाबत माहिती देऊन संस्कारक्षम पिढी निर्माण होण्याची आवश्यकता व्यक्त केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच इतिहासाची आठवण जिवंत ठेवणे हे व्रत आजच्या युवा पिढीने केले पाहिजे, ही अपेक्षा व्यक्त केली.

तसेच, स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडताना शिकागो येथील धर्म परिषदमध्ये भारताची दिलेली ओळख अत्यंत प्रेरणादायी असल्याचे नमुद केले.देशासाठी, समाजासाठी आजच्या युवा पिढीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Exit mobile version