माथेरानमध्ये पर्यटकांच्या वाहनांची सुरक्षा राम भरोसे

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान हे पर्यटनस्थळ असल्याने लाखो पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देत असतात. आपली खाजगी वाहने वन विभाग आणि वन व्यवस्थापन समिती मार्फत एकमेव असलेल्या वाहनतळात आणणार्‍या पर्यटकांना आपली वाहने पार्क करावी लागतात. परंतू तेथे चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. एका महिन्यात चोरीच्या तीन घटना घडल्या असून गाडीचे पार्ट आणि पेट्रोलची चोरी झाली आहे.
मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरान या पर्यटकांसाठी हे एकमेव वाहनतळ असून प्रत्येक वाहनांसाठी वेगवेगळा कर आकारला जातो. चारचाकी वाहनांना 100 रुपये आणि दोन चाकी वाहनांना 60 रुपये दर आकारला जातो.
मात्र त्या पर्यटकांच्या वाहनांची सुरक्षा राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दुचाकी वाहनांमधून पेट्रोेल काढले जात आहे तर काही वाहनांचे आरसे काढले जात आहेत. ही चोरीची समस्या खूप गंभीर असून याकडे वन व्यवस्थापन समिती आणि नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
एमएमआरडीएकडून वाहनतळाचे सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. विजेचे खांब लावून वीज पुरवठा सुरू होता. पण काही दिवसांपासून वाहनतळातील काही भागातील वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे वाहनतळात अडथळे निर्माण होत आहेत.
पर्यटक दस्तुरी येथील वाहनतळात वाहने घेऊन येतात. वाहन पार्किंगमध्ये यायच्या अगोदर घोडेवाले, रूम एजंट, कुली, हातरिक्षावाले हे गाडीच्या मागे धावत सुटतात. काही पर्यटक अक्षरशः घाबरतात. यांचा गराडा गाडी भोवती लागतो व जो तो आपल्या धंद्याची जाहिरात करावयास लागतो. काही पर्यटकांना माहीत नसल्याकारणाने ते घाबरून माथेरानमध्ये न येणेच पसंद करतात. त्यामुळे या वाहनतळात जाहिरातीसाठी त्यांना कोण प्रवेश देतो असा प्रश्‍न येथील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

Exit mobile version