| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
शिवसेना नेते रामदास कदम यांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केला आहे. त्यामुळे भाजपने दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघावर दावा करत विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यासमोर आव्हान उभं केले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित मनाली जात आहे. त्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. तर मनसेकडून वैभव खेडेकर यांच्याही नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे योगेश कदम यांना निवडून आणण्याचे आव्हान रामदास कदम यांच्या समोर असणार आहे.
शिवसेनेत पडलेली फुट, भाजपला थेट रामदास कदम यांनी दिलेले आव्हान, संजय कदम यांची वाढत जात असलेली ताकद, नुकत्याच लोकसभा निवडणुकीत आघाडीला मिळालेले मताधिक्य हे सर्व पाहात कदम यांच्या समोर निवडून येण्याचे मोठे आव्हान असणार आहे. दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. शिवसेनेचे सूर्यकांत दळवी या मतदारसंघातून तब्बल पाच वेळा निवडून आले होते. पण 2014 मध्ये युती तुटली. त्यात रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यातील वादाचा फटका शिवसेनेला बसला. त्यात निवडणुकीत सूर्यकांत दळवी हे पराभूत झाले. या लढाईत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या संजय कदम यांनी बाजी मारत शिवसेनेचा हा बालेकिल्ला काबीज केला होता.
त्यानंतर 2016 पासून तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी मतदारसंघातील वाडीवस्त्या पिंजून कढण्याचं काम सुरू केले. याच जोरावर 2019 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षाकडून तिकीट मिळवले. सूर्यकांत दळवी या जेष्ठ नेत्याची उमेदवारी कापत शिवसेनेनं योगेश कदम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. या निवडणूकीतही संजय कदम विरूद्ध योगेश कदम यांच्यात लढत झाली. त्यावेळी योगेश कदम यांना 95 हजार 364 मतं मिळाली. तर राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार संजय कदम यांना 81 हजार 786 मतं मिळाली. योगेश कदम हे दहा हजारा पेक्षा जास्त मतांना विजय झाला होता.
आमदार योगेश कदम यांनी गेल्या 5 वर्षात विकासकामाच्या माध्यमातून मतदारसंघ आपल्याकडे राहील यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांचे वडील आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या भाजपबद्दलच्या वादग्रस्त विधानांमुळे स्थानिक भाजपा नेतृत्वानं नाराजी व्यक्त करत या मतदारसंघावर दावा केला आहे. तसेच योगेश कदम यांना मदत करणार नसल्याचंही जाहीर केलं आहे. या सगळ्या वादामुळे योगेश कदम यांच्यासमोर यावेळी आव्हान उभं ठाकले आहे. माजी आमदार संजय कदम यांच्या आशा या सगळ्यामुळं पल्लवीत झाल्या आहेत. पराभूत झाल्यापासून तर ते मतदारसंघात फिरत होतेच, पण आता त्यांनी मतदारसंघामध्ये आपला वावर अधिक वाढवला आहे. सध्या ते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही ते आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी देखील जवळपास निश्चित मानली जात आहे.
तसेच विद्यमान आमदार योगेश कदम यांचे चुलत बंधू अनिकेत कदम हे योगेश कदम यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. संजय कदम यांनी आमच्या पडत्या काळात आम्हाला मदत केली. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असे अनिकेत कदम यांनी म्हटले होतं. त्यावरून योगेश कदम-संजय कदम यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. त्यामुळे घरगुती वादाचा फटका योगेश कदम यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे या मतदार संघात दोन शिवसेनेत लढत होणार हे जवळपास निश्चित आहे. असे असताना दुसरीकडे मनसेकडून राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे या मतदार संघात निवडणूक लढू शकतात. तसे झाल्यास इथे चुरस निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. खेडेकर यांनीही तशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत योगेश कदम आणि रामदास कदम या पिता पुत्राला युतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देता आले नव्हते. जर सुनिल तटकरेंना मताधिक्य मिळवून दिले नाही तर निवडणूक लढणार नाही अशी शपथही त्यावेळी योगेश कदम यांनी घेतली होती. त्यामुळे ते शपथेला जागतात की पुन्हा रिंगणात उतरतात ते पहाले लागले.